डॉक्‍टरांनो, हात जोडतो! 'या' मंत्र्याचे भावनिक आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड, मधुमेह, पित्ताशय, हर्निया, दात, हाड व नेत्रविकार असे अनेक आजार, व्याधी आहेत की यासाठी लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात जायचे कोठे? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.

कोल्हापूर- ‘‘शहरासह जिल्ह्यातील सर्वच खासगी डॉक्‍टरांनो, तुम्हाला हात जोडतो. ओपीडी आणि इतर सेवा सुरू ठेवा! ’’ असे भावनिक आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले. कोरोना सोडून इतर आजार आणि व्याधींच्या रुग्णांची फरफट होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

‘जिल्ह्यातील अनेक खासगी दवाखाने, मल्टिस्पेशालिटी दवाखान्यांनी कोरोनाच्या भीतीपोटी ओपीडी व इतर सेवा बंद केल्या आहेत. अथवा पॅरामेडिकल कर्मचारी येत नाहीत, अशी सबब सांगितली जाते. हे बरोबर नसून कोरोना सोडून अनेक आजार, व्याधी आहेत. त्यासाठी कोठे जायचे? खोकला, सर्दी, पडसे किंवा कोरोना लक्षणे असलेले रुग्ण ही सरकारी रुग्णालयात पाठवावे, अशी सूचना शासकीय पातळीवर केली आहे. पण, कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड, मधुमेह, पित्ताशय, हर्निया, दात, हाड व नेत्रविकार असे अनेक आजार, व्याधी आहेत की यासाठी लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात जायचे कोठे? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.

हे पण वाचा - बंदोबस्तासाठी पत्नी, चिमुकलीसह पोलिस उपाधीक्षक रस्त्यावर

गेल्या काही वर्षांपासून धर्मादाय दवाखान्यामधून दर आठवड्याला रुग्ण नित्यनियमाने मुंबईला जाऊन उपचार व शस्त्रक्रिया करून आणत होतो. मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेकांना मदत करीत होतो. कोरोनामुळे लॉकडाउनपासून वाहतूक बंद झाली. रुग्ग्णालयांनी ज्यांना तारखा दिल्या, ते रुग्ण माइयाकडे येतात, त्यांच्या व्यथा, त्यांचे होणारे हाल पाहिल्यावर मी निःशब्द होतो. मुंबईतील अनेक रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांत कोरोनाचा फैलाव झाल्याने शासनाने रुग्णालये ‘सील’ केली आहेत.  कोल्हापूरमधील मोठ्या खासगी रुग्णालयांतून उपचार करून घेणे एवढाच मार्ग आहे. तेवढी सेवा आपण करावी, अशी विनंती आहे.

हे पण वाचा - अखेर नडगिवेतील ती गुढी  19 दिवसानंतर उतरवली....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister hasan mushrif demand to doctor opd