शिवसैनिकांनो, राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करा

Minister of State for Home Affairs Shambhu Raje Desai.jpg
Minister of State for Home Affairs Shambhu Raje Desai.jpg

कोल्हापूर : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीत शिवसैनिकांनी झोकून देऊन काम करताना सूक्ष्म नियोजन करावे. मतदारांच्या घरापर्यंत पोचून त्यांचे मतदान उमेदवारांना होईल, याची दक्षता घ्यावी. महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज येथे केले. शिवसेनेतर्फे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. सीपीआर चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहात मेळावा झाला. 

श्री. देसाई म्हणाले, 'विधान परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी आहे. गेल्यावेळी युतीधर्म निभावण्याची भूमिका शिवसेनेची होती‌. यंदाच्या निवडणुकीत मात्र निवडणुकीचे नेतृत्व पक्षाकडे आले आहे. राष्ट्रीय स्तरावर राज्य शासनाची ठाकरे सरकार अशी ओळख आहे. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे उमेदवारांना विजयी करायचे आहे. त्याकरिता मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.'

पुढे ते म्हणाले, 'कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या भक्कम पाठीशी राहणारा आहे. देसाई कुटुंबियांचे तर तीन पिढ्यांचे कोल्हापूरशी संबंध आहेत. हा जिल्हा जागरूक असून, शिवसैनिकांनी सर्वच जिल्ह्यात ताकदीने कामाला लागण्याची आवश्यकता आहे.'

खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. मेळाव्यात वेळ न घालवता मतदारांच्या उंबर्‍यापर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. अरुण लाड यांना क्रांतिकारक विचारांचा वारसा आहे. त्यांच्यासह काँग्रेसचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांना निवडून देण्याची जबाबदारी  सर्वांवर आहे. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व आमच्या शिक्षण संस्थांतले मतदार उमेदवारांना निवडून आणण्यात कोठेही कमी पडणार नाहीत.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, प्रतिस्पर्धी पक्ष मतदारांना केंद्रापर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहन देतो. आपणही मतदारांपर्यंत पोचून संवाद साधणे आवश्यक आहे. शिवसैनिकांना मान-सन्मानाने काम दिल्यास ते कुठेही कमी पडणार नाहीत. पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवाराला मतदान म्हणजे ठाकरे सरकारला मतदान, हे लक्षात घेऊन कामाला लागावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व म्हणून हात बळकट करण्यासाठी इमाने-इतबारे काम करण्याची गरज आहे.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, 'आधीच्या पदवीधर आमदारांबाबत मतदारांत असंतोष आहे. त्याचा फायदा घेऊन इर्षेने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. अन्य निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. यावेळी विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजी जाधव, संग्राम कुपेकर उपस्थित होते. सुनील मोदी यांनी प्रास्ताविक केले. मंजित माने याने आभार मानले.

माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी मते मिळवण्यासाठी हुशारीने कामाला लागण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, उमेदवाराने ग्रामीण भागात पोचणे अवघड आहे. त्यामुळे उमेदवार आपल्या परिसरात आलाच पाहिजे, असा अट्टहास बाळगू नका. तुम्ही फक्त कामाला लागा आणि उमेदवाराला निवडून द्या.


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com