'स्वतंत्र सुरक्षा प्रस्तावाचा पाठपुरावा करू ; दिक्षा कायद्याची लवकरच पूर्तता'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

शंभूराज देसाई; अंबाबाई, जोतिबा मंदिरातील सुरक्षेचा आढावा

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिराच्या स्वतंत्र सुरक्षा व्यवस्थेच्या प्रस्तावावर पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. महिला सुरक्षा अंतर्गत दिक्षा कायद्याची लवकरच पूर्तता केली जाईल, असेही ते म्हणाले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या पाहणीसाठी 

देसाई कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर व श्री अंबाबाई मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचा आढावा घेतला. अंबाबाई मंदिराची सुरक्षाव्यवस्था सध्या पोलिस प्रशासनासह मंदिरातील खासगी सुरक्षारक्षकांच्या खांद्यावर आहे. 

हेही वाचा- प्रवासाला जाताय नो टेंशन ; बॅग घ्या भाड्याने -

मंदिरासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यासह पोलिस यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी आहे. याबाबतचा प्रस्तावही गृह विभागाकडे आहे. या प्रश्‍नी देसाई म्हणाले, ‘‘संबंधित प्रस्तावाची माहिती घेऊन सतेज पाटील यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून श्री अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र सुरक्षाव्यवस्था निर्माण करू. जोतिबा व अंबाबाई मंदिरातील सुरक्षेव्यवस्थेवर समाधानी आहे.’’ देसाई म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. गर्दी टाळून संसर्गाचे धोके कमी करण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. संसर्गाचा विचार करून हळूहळू मंदिरांसह सर्व गोष्टी सुरू केल्या जातील.’’

महिलांच्या सुरक्षेसाठी दिक्षा कायद्याचा लवकरात लवकर अंमल करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. यात आमदारांबरोबर, महिला संघटनेच्या सदस्या, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कायदा अभ्यासकांचा समावेश आहे. समितीही गठीत केली असून, त्यांच्याकडून लवकरच सादरीकरण केले जाईल. हा कायदा लवकरच अमलात येईल, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा-भेंडीनेही खाल्ला भाव : दराने घेतली दीडशेची धाव -

ऊस परिषद मर्यादित स्वरूपात हवी
गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा वाढणारा धोका विचारात घेऊन शिवसेनेने दसरा मेळावाही मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषद मर्यादित स्वरूपात व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घ्यावी, असे मत श्री. देसाई यांनी व्यक्त केले.

एकनाथ खडसे यांच्या अनुभवाचा महाआघाडीच्या सरकारला निश्‍चित फायदा होईल. पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी शिवसेनेत यावे, अशी चर्चा आहे. मीही सच्चा शिवसैनिक आहे. मलाही असे नेते शिवसेनेत यावेत आणि पक्षाची ताकद वाढावी, असे वाटते.
- शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister of state shambhuraj desai press conference kolhapur