गडहिंग्लजला मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले

Mobile Theft Increased In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Mobile Theft Increased In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : साहेब...माझा मोबाईल चोरीला गेला आहे, तो मिळेल का? अशी आर्त विनंती अनेक मोबाईलधारक करीत पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवतात. परंतु, पदरी निराशाच पडते. मोबाईल तर लांबच चोरटेही पोलिसांच्या हाती कधी लागले नाहीत. लागलेच तर, फिर्याद नाही म्हणून त्यांना सोडून दिले जाते. चोरी जास्त आणि ट्रेसिंग कमी अशी अवस्था मोबाईल चोरीची झाली आहे.

गडहिंग्लज शहरातून आठवड्याला सरासरी चार ते पाच मोबाईलची चोरी ठरलेली आहे. यातील काहीजण सुरक्षेसाठी पोलिसात जातात, बरेच जण पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी तिकडे फिरकतही नाहीत आणि अशा नोंद न झालेल्या चोरींची संख्याही जास्त आहे. काही घटनांमध्ये संशयीत रंगेहाथ सापडतात. परंतु, त्यांच्या विरोधात फिर्यादी नसल्याच्या कारणावरून ते विनासायास सुटतात. 

चोरीनंतर मोबाईल पहिल्यांदा स्वीच ऑफ होतो. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्याचे ट्रेसिंग सुरू होत असल्याचे सांगण्यात येते. परंतु, ट्रेसिंगचे प्रमाणच अगदी नगण्य आहे. स्थानिक पोलिसांकडून सायबर क्राईम विभागाकडे गुन्हाची नोंद पाठविल्यानंतर त्याचे पुढे काय झाले, हे मोबाईलधारकाला समजतच नाही. बहुतांश मोबाईलना इंटरनेट नसल्यानेही त्याचा शोध लागत नसल्याचे पोलिस सांगतात. हजारो रूपये किमतीचे मोबाईल मिळातोय का, या आशेवर संबंधीत व्यक्ती असते. परंतु, दोन-तीन महिन्यानंतर ही घटना विसरून तो नवीन मोबाईल घेतो. त्यानंतर मात्र जुन्या मोबाईलकडे दुर्लक्ष होते अन्‌ त्याचा पोलिस तपासही आपोआप थंडावतो. 

गल्ली ते दिल्लीचा प्रवास... 
चोरीच्या मोबाईलसाठी मोठे ब्लॅक मार्केट आहे. त्यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत साखळी कार्यरत असल्याची चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे सराईत चोरट्यांनी लांबवलेल्या मोबाईलची पुन्हा विक्री होत नाही. भुरटे चोरच मोबाईल विकतात. शहरात एखाद्या गल्लीतून चोरीला गेलेला मोबाईल संबंधित साखळीद्वारे दिल्लीपर्यंत जातो. ज्याच्यामुळे मोबाईल ट्रेसिंग होवू शकते, ते सीम आणि मदर बोर्डच स्क्रॅप केले जाते. डिस्प्ले, रिंगर, बॉडी, चार्जिंग स्ट्रिप असे साहित्य पुन्हा ब्रॅण्डेड म्हणून विक्रीसाठी मार्केटमध्ये येत असल्याचे सांगितले जाते. 

मोबाईल चोरी व ट्रेसिंग 
- 2019 : 62, ट्रेसिंग : 6 
- 2020 : 80, ट्रेसिंग : 15 

जुन्या हॅण्डसेटचा विचारच सोडून दिला
डिसेंबर 2019 मध्ये माझा मोबाईल गडहिंग्लज बाजारातून चोरीला गेला. पोलिसांत तक्रार दिली. परंतु, अजून त्याचा शोध नाही. अखेर मी नवीन मोबाईल घेतला आणि जुन्या हॅण्डसेटचा विचारच सोडून दिला. 
- संभाजी तराळ, मोबाईलधारक 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com