esakal | पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच काढला काटा ; व्यावसायिकाच्या खूनाचा झाला उलघडा

बोलून बातमी शोधा

mohammad jamadar crime case hupari crime news marathi

पत्र्याच्या पेटीमध्ये मृतदेह असल्याचे आढळून येऊन व्यावसायिकाचा खून झाला

पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच काढला काटा ; व्यावसायिकाच्या खूनाचा झाला उलघडा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 हुपरी (कोल्हापूर) : हंचिनाळ रोडवरील कोंढार मळ्याजवळ असलेल्या ओढ्यामध्ये पत्र्याच्या पेटीमध्ये बंद अवस्थेत तळंदगे येथील एका स्क्रॅप गोळा करणाऱ्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला.  आरोपींना कोगनोळी येथे आणून ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर पत्र्याच्या पेटीमध्ये मृतदेह असल्याचे आढळून येऊन व्यावसायिकाचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले. खून कोणी व का केला, याबाबत हुपरी पोलिस कसून चौकशी करत होते

याचदरम्यान अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पट्टण कोडोली येथे पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून करून मृतदेह लोखंडी पेटीत कोंबून कर्नाटक मधील कोगनोळी गावा जवळ ओढ्यात टाकल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. महम्मद बंडू जमादार वय 50 रा.तळंदगे फाटा पट्टण कोडोली) असे खून झालेल्याचे नांव आहे. 

याप्रकरणी हुपरी पोलीसांनी संशयित पत्नी तहसिम महम्मद जमादार ( वय 39 ) हिच्यासह सौरभ पांडुरंग पाटील ( रा. कोल्हापूर) व सूरज महम्मदहनिफ शेख ( रा. बिरदेव वसाहत कागल) अशा तिघांना अटक केली आहे. मुख्य संशयित आरोपी प्रियकर सचिन गजानन मगदूम - माळी ( वय 22 रा. हुपरी) हा फरार झाला आहे. महम्मद प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळे कर्ज मिळवून देतो असा बहाणा करून महम्मद यास लाल रंगाच्या मोटारीतून नेऊन हुपरी व कागल परिसरात फिरवत त्याचा कायमचा काटा काढण्यात आला. निर्दयपणे झालेल्या या खून प्रकरणाची चर्चा सुरू आहे. 

महम्मद जमादार यांचा स्क्रॅप तसेच जुन्या टायर्स गोळा करून विक्री करण्याचा व्यवसाय होता. शुक्रवारी (ता. 26) सकाळी आपल्या मालवाहतूक जीप ( क्र. एम एच 09 सीयु 8324 ) घराबाहेर पडले. तेव्हा पासून ते घरी परतले नव्हते. त्यामुळे ते बेपत्ता झाल्या बाबतची फिर्याद पत्नी तहसिम जमादार यांनी शनिवारी (ता. 27) दिली होती. 

दरम्यान, हुपरी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या तपासात पत्नी तहसिम हिची कसून चौकशी केली असता महम्मद जमादार यांचा कट रचून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संशयित सौरभ पाटील व सुरज शेख यांच्या मुसक्या आवळल्या. तर प्रियकर सचिन मगदूम फरार झाला. पोलीसी खाक्या दाखवताच सौरभ पाटील व सुरज शेख यांनी खूनाची कबूली दिली.

त्यानुसार संशयितांना कोगनोळी ( ता.चिकोडी ) येथे प्रत्यक्ष घटनास्थळी तपासासाठी फिरवले. त्यावेळी तेथील कोंढार मळ्या नजिकच्या ओढ्यात लोखंडी पत्र्याची पेटी पाण्यावर तरंगत असलेली आढळून आली. पेटी पाण्याबाहेर काढून कुलूप तोडून उघडली असता त्यामध्ये महम्मद जमादार यांचा मृतदेह हातपाय व मान दुमडुन पोत्यात बांधून तो पेटीत कोंबून घातल्याच्या अवस्थेत दिसून आला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा- स्क्रॅप व्यावसायिकाचा खून,  कोगनोळीत टाकला मृतदेह : चक्क आरोपींनी दाखविले ठिकाण

पती बेपत्ता झाल्याची फिर्याद लगेचच दुसऱ्या दिवशी दिल्याने पत्नी तहसिम हिच्यावर पोलीसांचा संशय बळावला. त्यामुळे अवघ्या चोवीस तासाच्या आत बेपत्ता प्रकरणाचा छडा लावत पोलीसांनी तिघांना गजाआड केले. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पल्लवी यादव, सहायक फौजदार सचिन सावंत, प्रल्हाद कोळी, प्रकाश घाटगे, पोटकुले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक घुले आदीनी कामगिरी बजावली. 

 मुख्य संशयित आरोपी प्रियकर सचिन मगदूम याच्यासह इतर आरोपी 22 ते 35 वयोगटातील आहेत. यापैकी सौरभ पाटील हा एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. 


संपादन- अर्चना बनगे