मटक्‍याने साधला "मोका' 

मटक्‍याने साधला "मोका' 

कोल्हापूर : मटका घेताना सापडले की, रात्रभर आत बसायचे. दुपारी कोर्टात हजर. गुन्हा कबूल केला की, हजार-पाचशे रूपये दंड आणि पुन्हा रात्री मटका घ्यायला तयार हे दिवस आता संपले आहेत. मटका घेतल्यावर फार काही होत नाही, या भ्रमात असलेल्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा झटका बसला आहे.

मटक्‍याद्वारे पैसा मिळविणे व त्याच्या आधारावर गुंडगिरी पोसणे असले धंदे करणाऱ्यांना मोका कारवाई अटळ ठरणार आहे. मटका जुगार अड्डे चालविले तरी आपले कोणी काही बिघडवू शकणार नाही, या समजूतीत असलेल्यांना धक्का बसला आहे. 

कोल्हापूर परिसराचा विचार केला तर मटका धंद्याचे जाळे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र पसरले होते. हप्त्याच्या जोरावर सारे काही बिनधास्त चालू होते. कधी तरी नाममात्र कारवाई ठरलेली होती. आणि असल्या कारवाईची मटकेवाल्यांना कधीच चिंता नव्हती. मटक्‍याच्या काही सूत्रधारांपर्यंत ही कारवाई पोचत नव्हती. कारण गुन्हे अंगावर घ्यायला पंटर मंडळींची फौजच त्यांनी तयार ठेवली होती. 

या वातावरणामुळे जिल्ह्यात मटका बिनधास्त फोफावला. कोल्हापुरात तर मटक्‍याचे मुख्य सूत्रधारच तयार झाले. मटक्‍यातून मिळणाऱ्या रोजच्या ताज्या पैशावर राजकारण करू लागले. मटक्‍यातून मिळणाऱ्या पैशातून "दानधर्म' करत आपली दानशूर म्हणून प्रतिमा निर्माण करू लागले. बेरोजगार तरूणांच्या टोळक्‍यांना पासू लागले. त्यातून दादागिरी, दहशत निर्माण करू लागले. महापालिकेच्या राजकारणातही काही जण उतरले. मटक्‍यातून मिळणाऱ्या पैशामुळे आपल्याला काहीही अशक्‍य नाही, अशा थाटात ते वागू लागले. गणेशोत्सव, मोहरम, स्थानिक जत्रा-यात्रा, सणा-समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून वावरू लागले. पैशाची एवढी मस्ती की, पोलिसांवर हात टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. 

अर्थात या काळ्या कृत्यांचे दिवस हळूहळू भरत आले. मटक्‍यातून मिळणारा पैसा व त्याआधारे संघटित गुन्हेगारीमुळे मोक्‍याच्या कारवाईचा प्रस्ताव तयार झाला. अर्थातच त्याला आव्हान दिले गेले. ते आव्हान फेटाळले गेले आणि मटकेवाल्यावर मोका कारवाईचा फास अधिक घट्ट झाला. कोल्हापुरात काळ्या धंद्याच्या पैशावर आपण काहीही करू शकतो, या प्रवृत्तीला यानिमित्ताने रोखले गेले. 

पोलिस दलाची टीम राहिली अभेद्य 
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन प्रशिक्षणार्थी अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा, पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे ही पोलिस दलाची टीम या प्रकरणात अभेद्य राहिली. सचिन पाटील, सोमनाथ पानारी, नंदू देसाई, अभिजित पाटील हे पोलिस कर्मचारी न्यायालयीन कामकाजात मदत करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com