इतिहास घडविणाऱ्या मल्लाचे स्मारक दुर्लक्षित 

Monument ignored for Wrestler Ganpatrao Khedkar
Monument ignored for Wrestler Ganpatrao Khedkar

नवेखेड (जि. सांगली) : नवे खेड (ता. वाळवा) येथील पहिले डबल महाराष्ट्र केसरी दिवंगत पैलवान गणपतराव खेडकर यांचे त्यांच्या जन्मगावी छोटेखानी स्मारक व्हावे ही कुस्ती शौकिनांची मागणी गेली सहा वर्षे प्रलंबित आहे. आज त्यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गावकऱ्यांनी मागणीचा पुनरूच्चार केला.  

नवेखेड सारख्या ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पैलवान गणपतराव खेडकर यांनी लाल मातीशी इमान राखत कुस्तीमध्ये आपले नाव अजरामर केले. कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेस तालमीत त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मेहनत घेत त्यांनी आपल्या कुस्ती करकीर्दीस सुरवात केली. डाव्या पवित्र्यात लढणारे खेडकर पैलवान डोळ्याचे पाते लवते न लवते तोच निकाली कुस्ती करत, असे कुस्तीचे जाणकार आजही सांगतात. पोकळ घिस्सा हा त्यांचा हुकमी डाव, दररोज दोन हजार जोर, चारशे सपट्या, अडीच हजार बैठका, खासबाग मैदानावरील जिन्याची ५० वेळा चढ उतार करणे, पाच मैल धावणे. असा खेडकर यांचा रोजचा सराव होता. या जोरावरच त्यांनी अवघ्या 21 व्या वर्षी 1964 ला अमरावती येथे तिपन्नाअंकलीकर या सोलापूरच्या मल्लास चित्रपट करीत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. दुसऱ्या वर्षी नाशिकला मोहनसिंग भिसेनी या वर्ध्याच्या मल्लास चित्रपट करीत  दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावून पहिले डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकाविला.  पाच वेळा ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा बहुमान त्यांना मिळाला. कुस्ती कारकीर्द बहरत असताना पैलवान दीनानाथ सिंह, पैलवान आप्पासाहेब कदम, नामदेव मुळे, संभाजी पाटील आजगावकर, टोपाना गोजगे  या  मल्लांना मार्गदर्शन केले. हे सर्वजण महाराष्ट्र् केसरी पैलवान घडले. 

रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार या आपल्या पठ्ठया करवी दिल्लीचा मल्ल सतपाल याला ऐन उमेदीच्या काळात बेळगाव मुककमी चारीमुंड्या चितपट केले. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने या गुरुशिष्य जोडीचे कौतुक केले. 

स्तीमध्ये अस्सल हिरा असणारे खेडकर पैलवान मात्र नेहमी उपेक्षित राहिले. वडिलार्जित असणाऱ्या शेतीवर त्यांच्या कुटुंबाची वाटचाल सुरू राहिली. कुस्तीत नाव मिळाले परंतु आर्थिक स्थेर्य कमीच राहिले. त्यांचा स्वभाव सडेतोड होता. ८० च्या दशकात ते गावी परतले. त्यांनी मिळवलेल्या महाराष्ट्र् केसरीच्या दोन्ही गदा त्यावेळी कोल्हापूरहून आणल्या नाहीत. त्या गदाबद्दल आजही कुणाला माहिती नाही. 

त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या कुस्ती कारकिर्दीची सुरवात केली ती गावची तालीम सध्या जमीनदोस्त झाली आहे. त्या ठिकाणी तालमीचे पुरुज्जीवन व छोटेखानी स्मारक व्हावे ही मागणी दुर्लक्षित झाली आहे. त्यामुळे नवेखेड येथील ग्रामस्थ व कुस्ती प्रेमींमध्ये नाराजी आहे. त्यांचा इतिहास टिकवायचा असेल तर नवीन तालीम व स्मारक होणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com