अपंग, निराधारांचा चंदगड तहसीलवर मोर्चा

सुनील कोंडुसकर
Saturday, 23 January 2021

चंदगड तालुक्‍यातील अंध, अपंग, अनाथ, विधवा, परितक्ता महिला, निराधार बांधवांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

चंदगड : तालुक्‍यातील अंध, अपंग, अनाथ, विधवा, परितक्ता महिला, निराधार बांधवांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेस पात्र ठरूनही लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. तहसीलदार विनोद रणावरे यांना निवेदन देण्यात आले. 

जुन्या बसस्थानकापासून मोर्चाला सुरवात झाली. "आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे', "आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा' अशा घोषणा देत हा मोर्चा नवीन वसाहतीतून कोर्टमार्गे प्रशासकीय भवनवर आला. मोर्चासमोर बोलताना संघटनेचे अध्यक्ष जोतिबा गोरल म्हणाले, ""दोन वर्षांपासून अंध, अपंग बांधवांच्या समस्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुर्बल घटकांना न्याय देण्याची मागणी केली होती;

परंतु अद्यापही न्याय मिळालेला नाही.'' यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. 30 मागण्यांचे निवेदन तहसीलदार विनोद रणावरे यांना देण्यात आले. यासंदर्भात शासनाने संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. 

मागण्या अशा... 
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दर महिन्याच्या पाच तारखेला पेन्शन मिळावी. पेन्शन देताना बॅंकेकडून तिरस्काराची वागणूक बंद करावी. एका कुटुंबात अनेक दुर्बल असतील तर त्या प्रत्येकाला स्वतंत्र पेन्शन मिळावी. जुनी उत्पन्न अट रद्द करून ती वार्षिक एक लाख करावी. प्रत्येकाला स्वतंत्र रेशन कार्ड मिळावे. अंत्योदय योजनेतील 25 किलो तांदूळ व 15 किलो गहू मिळावा. लाभार्थीच्या हयातीचे दाखले ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याची व्यवस्था करावी. मोफत घरकुल योजना प्रत्येकाला मिळावी. सद्य स्थितीत राहात असलेल्या घरकुलाचा घरफाळा, पाणी पट्टी व वीज बिल माफ करावे, आदी मागण्या केल्या आहेत. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morcha At Chandgad Tehsil Office Kolhapur Marathi News