कोल्हापुरकरांनी केली बंगळूरच्या माय-लेकींची सुखरूप पाठवणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

लॉकडाऊननंतर कर्नाटक बससेवा सुरू झाली आणि डबडबलेल्या डोळ्यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानतच त्यांनी निरोप घेतला

कोल्हापूर : कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. परदेशातील रस्त्यावरच खोकत स्वतःचा जीव गमावणाऱ्यांचे व्हिडिओ मिनिटा-मिनिटाला सोशल मीडियावरून शेअर होत होते. बिनओळखीचा चेहरा दिसला की त्याला हाकलून लावले जात होते. यातच साडेचार महिन्यापूर्वी बिनखांबी गणेश मंदीर चौकात रात्री माय-लेकीला हाकलून लावले जात असल्याची घटना व्हाईट आर्मीच्या जवानांच्या निदर्शनास येताच त्यांनी हस्तक्षेप केला. संबंधित माय-लेकीला सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर आजअखेर त्यांची विविध संस्थांनी जबाबदारी घेतली. पण त्यांना मुळगावी परतण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. लॉकडाऊननंतर कर्नाटक बससेवा सुरू झाली आणि डबडबलेल्या डोळ्यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानतच त्यांनी निरोप घेतला. 

हेही वाचा - कोकणात काळ्या तिळाचे होणार संशोधन 

मुळच्या बंगळूरच्या फातिमा बानू आणि त्यांची मुलगी सिमरन यांनी जात-धर्म आणि सीमावादापलिकडची कोल्हापूरकरांची ही अनोखी माणुसकी अनुभवली. फातिमा यांना अर्धांगवायू असल्याच्या स्पष्ट खुणा त्यांच्याकडे पहाताच दिसतात तर सिमरन दहा वर्षाची आहे. दोघीही लॉकडाऊन जाहीर झाले आणि कोल्हापुरातच अडकल्या. भिकारी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यातूनच जिथे असतील तिथून त्यांना हाकलले जायचे. रात्रीच्या वेळेस त्यांच्यावर दगडफेक करत असल्याची घटना लक्षात येताच व्हाईट आर्मीचे जवान राजू कुंभार, विनायक भाट यांनी संस्थापक अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधला आणि  रोकडे यांनी राजवाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद जाधव यांना ही माहिती देताच त्यांनीही सहकार्य केले. 

108 ऍम्ब्युलन्समधून या माय-लेकीला सीपीआरमध्ये दाखल केले गेले. दोघींचेही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना सायबर रोडवरील अल्पसंख्यांक वसतिगृहात दाखल केले. पण, काही दिवसांनी फातिमा यांनी बंगळूरला परत सोडण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांना सोडण्याची व्यवस्था झाली. पण, कोगनोळीपर्यंत गेल्यानंतर मात्र त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला गेला नाही. मग, त्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. एकेक दिवस जात होता तरीही काहीच मार्ग निघत नव्हता. पुन्हा त्यांना अल्पसंख्यांक वसतिगृहात आणले. 

हेही वाचा -  कोकणात कमी होत चाललेली पिके लागलीत बहरायला 

काही दिवसांनी मात्र त्यांना वानप्रस्थ संस्थेने आधार दिला. सुलोचना श्रीधर, इंद्रायणी मळगे त्यांच्या मैत्रणी बनल्या. पण, तरीही बंगळूरला परतण्याची फातिमा यांची मागणी कायम होती. अखेर महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरू झाल्यानंतर त्यांना परत पाठवले. नवीन कपड्यांचा आहेर आणि कोल्हापूरकरांच्या मायेच्या ओलाव्याची शिदोरी घेवूनच त्यांनी सर्वांना निरोप दिला. दरम्यान, हेल्पलाईन ग्रुपचे सचिन घाटगे, प्रशांत साठे, गणेश कांबळे, गणेश यादव, यासमिन काझी आदींची या काळात मोलाची मदत झाल्याचे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे सांगतात. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother and daughter stive lockdown period in kolhapur but both are back to home for bangalore