‘माझे कुटुंब’ मोहिमेपासून गावातील नेते चार हात लांबच 

सुनील पाटील | Monday, 28 September 2020

प्रशासकासाठी इच्छुक, कामावेळी गायब  

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. यावेळी, आपण किती समाजसेवक आहे, हे दाखविण्याची एकही संधी प्रशासक नियुक्तीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी सोडली नाही. मात्र, अधिकारीच प्रशासक म्हणून नियुक्त झाल्यानंतर हे गावची सेवा करण्याचे नियोजन करणारे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासारख्या मोहिमेपासून चार हात लांबच आहेत.

हे लोक प्रशासक नियुक्ती दरम्यान आम्ही किती समाजसेवक आहे आणि गावचे हित जोपासणारे आहोत हे दाखवत होते. आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेत त्यांना आपले काम दाखविण्याचे संधी असतानाही या मोहिमेपासून लांब राहिले आहेत. आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका, आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार हे काम प्रामाणिकपणे करत आहेत, यात दुमत नाही. याला जर अशा समाजसेवक स्वयंसेवकांची जोड मिळाल्यास जिल्हा कोरोनामुक्त होण्यास फार वेळ लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. 
सुमारे ४०० ग्रामपंचातींवर प्रशासक नियुक्त करायचे होते.

हेही वाचा- के.पीं.चा  झेन व क्वालीसचा ४४७७ नंबर गावागावांत फेमस -

यावेळी, एका-एका गावात ५० ते १०० जण इच्छुक होते. ग्रामपंचायतीवर प्रशासक होण्यासाठी गाव-पातळीवरील नेत्यांपासून ते जिल्हा आणि राज्यपातळीवरील लोकप्रतिनिधींना साकड घालत राहिले. गावात मी काय करतो, हे सांगण्यासाठी अनेक धडपड केली. मात्र, सरकारने प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांचीच नियुक्ती केली. आता त्या दिवसापासून या तथाकथित समाजसेवकांनी ग्रामपंचायतीचे तोंड बघणेही बंद केले. आता अशा समाजसेवक आणि स्वयंसेवकांची नितांत गरज आहे. घरोघरी जाऊन सरकार पथकाला ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला हातभार लावणे अपेक्षित आहे. या कार्यालयात काही सामाजिक सेवा, तरुण मंडळांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याला हाता या स्वयंसेवकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे ही मोहीम अधिक क्षमतेने पार पडू शकते.

इच्छुकांनी पुढे येण्याची गरज 
जिल्ह्यातील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे जिल्ह्यात प्रत्येक घरा-घरांतील कोरोनासदृश रुग्ण शोधण्यास मदत होत आहे. त्यामुळे या सर्वांनी या मोहिमेत गावपातळीवरील तरुणांनी सहभाग घेणे गरजेचे आहे.

संपादन - अर्चना बनगे