माझ्या पोटाला पण मिळू द्या दोन रुपये ; नजमा भाभींच्या जगण्याला पणतीचा प्रकाश

मतीन शेख
Wednesday, 11 November 2020

प्रत्येकाला हा थकलेला देह पणती, उटणे घेण्याची विनंती करत आहे....

कोल्हापूर - दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा अन्‌ मिनमिणत्या दिव्याचा तेजोमय सण, पणती हे या सणाचं जणू प्रतीकच, याच प्रतिकाला हाताशी घेत 72 वर्षाच्या नजमा सय्यद जगण्यातला प्रकाश शोधत आहेत. महाद्वार मार्गावर रस्त्याच्या कडेला 10 वर्षे पणत्यांच्या विक्रीतून चार पैसे जोडण्याचा त्यांचा हा अट्टहास गलबलून सोडणारा आहे.

नजमांच बालपण गरिबीच्या होरपळीतच गेलं. लग्न होऊन त्या शाहूपुरीत आल्या. पतीच्या सोबतीने अगरबत्तीचा कारखाना उभारला. संसार वेलीवर तीन फुलं उमलली. ती मोठी केली पण आनंदाचा संसार सुरु असतानाच 20 वर्षापूर्वी नजमांच्या पतीचं निधन झाले अन्‌ संसाराला घरघर लागली. मुलांच्या वाटा बदलल्या. पण नजमांनी स्वाभिमानी जगणं सोडलं नाही.

माझ्या पोटाला पण मिळू द्या दोन रुपये...

प्रत्येकाला हा थकलेला देह पणती, उटणे घेण्याची विनंती करत आहे. काही लांबूनच नकार देतात तर काही पणतींच्या किंमतींची चौकशी करत घासघीस करतात. तेव्हा नजमा म्हणतात 'काचेच्या चकमकीत दुकानातून आहे, त्या किमतीला वस्तू घेता की ओ!,
इथं माझ्या पोटाला पण मिळू द्या, दोन रुपये, दहाला दोन आहेत पण तुम्ही आलायसा माझ्याकडं तर घ्या दहाला तीन.' यावेळी मात्र समोरचा ग्राहक बरं द्या, आज्जी', असा होकार टाकतो, तेव्हा नजमा यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. दिवाळी, दसरा, गणपती उत्सव हे त्यांच्या आधाराचे सण. दिवाळीत पणती, उटणे विकणे. दसऱ्याला नवधान्य विकणं हे त्याचं काम, दिवसाल्या मिळणाऱ्या शंभर, दिडशे रुपयावर ते दवा औषधाचा, रोजचा खर्च भागवतात.

स्वाभिमानी जगणं...

नजमा म्हणतात,'दिपावलीत 'अली' आहे तर रमजानमध्ये 'राम' आहे. हे सर्व सण उत्सव लोकांना आनंद देतात. माझ्या जगण्यालाही हे सणच आधार आहेत. आल्लाह कृपाळू आहे अन्‌ आई अंबाबाईचा आशिर्वाद ही माझ्यावर आहे. म्हणून तर मी तिच्या दारात बसून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.'  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Najma Syeds struggle in his life in kolhapur city

Tags
टॉपिकस
Topic Tags: