Video -हे दिवस जाणार...कोरोना जाणार म्हणतंय..! 

nandi bail kolhapur corona corona virus
nandi bail kolhapur corona corona virus

कोल्हापूर - ढोलके ढुबुक ढुबुक वाजू लागले. ""हे दिवस लवकर जाणार.... हे दिवस देखील लवकर जाणार... अशी लय नंदीबैल वाल्याच्या लांबलचक सुरात टिपेला पोहचते आणि एकाक्षणी नंदीबैलाची मान होकारार्थी अर्थाने डुलायला सुरू होते. नंदी बैल "कोरोना जाणार' असे म्हणतोय म्हटल्यावर आजूबाजुच्या बाया बापड्या पोरांच्या तोंडावर समाधानाची हलकीशीच रेशा उमटते. यात "नंदी बैल जे म्हणेल ते खरे होणार' ही केवळ एक भाबडी समजूत असते. पण कोरोनाचे वातावरण किती तळागाळापर्यंत जाऊन झिरपले आहे. याचे दर्शन नंदी बैलाच्या या मान डोलावण्यातून घडत आहे. 

येथील नाना पाटील नगरात एका माळावर नंदीबैलाची वस्ती आहे. वास्ताविक हा काळ नंदीबैलवाल्यांच्या सुगीचा काळ. या काळात गावागावात जायचे. बाया बापड्यांच्या मनाला समाधान होईल, अशा अर्थाने नंदीबैलाला मान डोलवायला लावायची. सुपातून धान्याची भिक्षा घालायची व अशी मजल दरमजल करत गावागावांत फिरायची त्यांची परंपरा आहे. एरव्ही पीक पाणी चांगले असेल का? घरात धन धान्य येईल का? पोराबाळांची लग्न होणार का? अशा प्रश्‍नांची उत्तरे नंदी बैलालाकडून मान डोलावून घेतली जातात. चिंतेत असणाऱ्यांना ती समाधान देतात. पण आता नंदीबैल बैलवाल्यांनी कोरोना हा करंट विषय घेतला आहे. नाना पाटलाच्या माळावार त्यांच्या झोपड्या आहेत. तेथे नंदीबैलाची देखभाल आणि सराव सुरू आहे. कोरोना जाणार, चांगले दिवस येणार अशा आशयाचे सुर नंदीबैलाच्या कानावर बिंबवून त्याला होकारार्थी मान डुलवायला लावायची ही रंगीत तालीम सुरू आहे. लोकांना मानसिक आधार देण्याचा लोकपरंपरेचा हा भाग आहे. त्यात काही तथ्य नाही हे ही खरे आहे. पण औषध, खबरदारी आणि मानसिक आधाराची लोकांना या क्षणी गरज आहे. ते काम नंदीबैल करणार आहे. संचारबंदी उठल्यावर जेंव्हा नंदीबैलवाले बाहेर पडतील, तेव्हा चक्क नंदीबैलवाल्याच्या ढुबु ढुबु ढोलक्‍याच्या सुराला कोरोनाची किनार असणार आहे. 

स्वयंसेवी​  संस्थांची मदत 
नाना पाटील नगरातल्या या नंदीबैलवाल्यांना स्वयंसेवी संस्था जीवनावश्‍यक साहित्य व नंदीबैलांना चारा पुरवतात. नंदी बैलवाल्यांच्या या तांड्यात दोन मोठे बैल व चार छोटे बैल आहेत. मान कशी व कधी डोलवायची याचा सराव बैलांना अशा फावल्या वेळात चालू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com