दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची दुसऱ्या दिवशीची सोहन कमलपुष्पातील पूजा

निवास मोटे 
Sunday, 18 October 2020

जोतिबा देव अन्  सोहन कमलपुष्पातील पूजा ... 

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा नवरात्रोत्सव हा इतर देवदेवतांच्या पेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे . त्याला अध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे . याठिकाणी नवरात्रोत्सव काळात श्रींच्या वेगळ्या रूपातील सोहनकमल पुष्पातील महापूजा बांधल्या जातात . त्या प्रत्येक पाकळीस मोठे महत्त्व आहे .

पाच पाकळ्या पैकी तीन पाकळ्या या श्री जोतिबा देवाचा त्रिदेवात्मक अवतर दर्शवितात . तर खालील दोन पाकळ्या या कमळ पुष्पाची द्विदल आहेत . हे मनातील सगुणनिर्गुण भावांचे प्रतीक आहे . या महापूजा विषयी असे सांगितली जाते की श्री केदारनाथ (जोतिबा ) राज्याभिषेक झाल्यानंतर अष्टभैरव व देवांचा सेनाधिपती काळभैरव करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी चोपडाईदेवी व सैन्यासह सर्व लवाजमा  नवरात्र उत्सव काळात मंदिरात होता . त्यावेळी कमळभैरव श्री जोतिबा देवाना प्रत्येक नवरात्र उत्सव काळात पूजेसाठी खास काशीहून सुवर्णकमळ आणून देत अशी आख्यायिका आहे . त्याच्या आधारे डोंगरावर रंगीत कपड्यांच्या कमळातील पाकळ्या करून त्यांना पूजा बांधतात .या महापूजा दहा गावकर व पुजारी बांधतात . 

 आज नवरात्रातील दुसऱ्या दिवशी श्री जोतिबा देवाची पाच पाकळी  सोहन कमलपुष्पातील खडी महापूजा बांधण्यात आली . नवरात्रोत्सवात नऊ दिवस श्रींच्या सोहन कमलपुष्पा तील महापूजा बांधल्या जाणार आहेत .या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे या पूजा अतिशय देखण्या व डोळ्याची पारणे फेडणाऱ्या असतात . डोंगरावरील पुजारी वर्गाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व प्रकारच्या महा पूजा बांधण्यात ते पटायत आहेत . त्यांना महाराष्ट्रात सर्वत्र महापूजा बांधण्यासाठी आमंत्रित केले जाते .

 

कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यासाठी दोन तास लागतात . गावातील दहा गावकर याचे नियोजन करतात .सकाळी मंदिरात श्री स्त्रोत्र केदार महिमा  या विधींचे पठण झाले . त्यानंतर  महापूजा बांधल्या . सकाळी दहा वाजता  धुपारती सोहळा झाला.त्यानंतर मुळमाया यमाईदेवी कडे लवाजमासह गेला . गावात या सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत झाले . या वेळी देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे  सरपंच राधा बुणे श्रींचे पुजारी ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते .आज रविवार असून ही पूर्ण डोंगर शांत होता . नवरात्र उत्सव काळात डोंगरावर भाविकांना येण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने भाविक फिरकले नाहीत. 

जोतिबा देवाच्या नवरात्र उत्सवातील महापूजा बांधण्याची तयारी आदल्या दिवशी केली जाते . रंगीत कापडाच्या चुन्या करून पाकळ्या कराव्या लागतात . या महापूजा बांधण्यासाठी दीड -दोन तास वेळ लागतो .

अंकुश दादर्णे ( गावकर ) ,पुजारी  जोतिबा डोंगर

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri festival on the second day of five petals of Shri Jyotiba Deva erected in the Sohan lotus flower