esakal | पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

NCP nominates Arun Lad from Pune graduate constituency

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी कुंडल  अरुण  लाड यांना पदवीधर मतदारसंघाचे उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता

पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : पुणे विभागातून पदवीधर मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून कुंडलचे ज्येष्ठ नेते अरुण  लाड यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी कुंडल येथील कार्यक्रमात अरुण  लाड यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, तो यानिमित्ताने पाळला आहे.


विधानपरिषदेच्या पुणे मतदारसंघातून आता एकाच विधानसभा मतदार संघातील दोन उमेदवारांमध्ये चुरस रंगणार आहे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव चे संग्रामसिंह देशमुख यांना भाजपने उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीने प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे.भाजपने दोन दिवसांपूर्वीच आपले अधिकृत उमेदवार म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी घोषित केली होती. मात्र राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. सोलापूर जिल्ह्यातील उमेश पाटील यांचे नाव पुणे विभागातून चर्चेत होते. मात्र शरद पवार यांनी अरुण लाड यांना दिलेल्या शब्दाची आठवण ठेवून त्यांना उमेदवारी दिली आहे.


पदवीधर विधानसभा मतदार संघाच्या गेल्या निवडणुकीत अरुण लाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली होती त्यावेळी त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपचे तत्कालीन उमेदवार आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना झाला होता. ते सलग दुसऱ्या वेळी पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यानंतर राज्याचे महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री ही झाले.


दोन वर्षापूर्वी कुंडल येथे अरुण लाड यांच्या अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी 2014च्या पदवीधर निवडणुकीत अरुण यांना उमेदवारी न देणे ही चूक होती आणि ती पुढच्या वेळी नक्कीच दुरुस्त करू अशी ग्वाही दिली होती. तेव्हापासूनच पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.


विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर अरुण लाड यांनी आपली उमेदवारी गृहीत धरून कामे सुरू केली होती. परंतु ऐनवेळी सोलापूर जिल्ह्यातील उमेश पाटील यांचे नाव जोरदार चर्चेत आले. त्यामुळे गेले दोन दिवस अरुण लाड यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अरुण लाड यांना उमेदवारी देण्याबाबत असा आग्रह धरला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अरुण लाड यांनाच उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा त्यांचा दिवस आहे. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेत अखेर राष्ट्रवादीने अरुण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आणि त्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अरुण लाड आज दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संपादन - अर्चना बनगे