शिवाजी पेठेत राष्ट्रवादीची नवी खेळी 

डॅनियल काळे | Tuesday, 29 December 2020

महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाचीच भूमिका बजावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोडण्या लावायला सुरवात केली आहे. एका प्रभागात एकापेक्षा जादा मातब्बर उमेदवार असतील, तर तेथे तडजोडी घडवून आणल्या जात आहेत. शिवाजी पेठेतील तीन प्रभागांत अशा जोडण्या आज राष्ट्रवादीचे नेते आणि ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घडवून आणल्या.

कोल्हापूर :  महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाचीच भूमिका बजावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोडण्या लावायला सुरवात केली आहे. एका प्रभागात एकापेक्षा जादा मातब्बर उमेदवार असतील, तर तेथे तडजोडी घडवून आणल्या जात आहेत. शिवाजी पेठेतील तीन प्रभागांत अशा जोडण्या आज राष्ट्रवादीचे नेते आणि ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घडवून आणल्या. अजित राऊत, उत्तम कोराणे आणि महेश सावंत या गेली पंधरा वर्षे सभागृहात असणाऱ्या नगरसेवकांत मुश्रीफांनी तडजोड घडवून आणली. आणखीन काही प्रभागांतही नव्या चाली पक्षाला कराव्या लागणार आहेत. 
महापालिका निवडणुकीच्या राजकारणाला आता जोर चढत आहे. सत्तारूढ दोन्ही कॉंग्रेस जोडण्या करण्यात आघाडीवर आहेत. शिवाजी पेठेत दोन निवडणुकींपासून अजित राऊत, उत्तम कोराणे, तसेच शेजारील प्रभागातील महेश सावंत हे नगरसेवक म्हणून निवडून येतात. 
यंदाही हा बालेकिल्ला राष्ट्रवादीला सांभाळायचा असल्याने तशा जोडण्या सुरू आहेत. पद्माराजे उद्यान हा प्रभाग तसा श्री. राऊत यांनी अनेकदा आपल्याकडे ठेवला आहे. या प्रभागातून ते 2005 पासून सातत्याने उच्चांकी मताने निवडून येत आहेत; पण या प्रभागात वेताळमाळ तालीम महत्त्वाची संस्था आहे. या प्रभागावर सध्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गाचे आरक्षण आहे; पण अर्चना कोराणे आणि सुनीता राऊत या दोघीही या प्रभागात इच्छुक आहेत. यापूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी बबनराव कोराणे यांना शब्द देऊन पुढच्यावेळी अर्चना यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे आता पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या राऊत यांनाही डावलून चालणार नाही, आणि कोराणे यांना उमेदवारी देण्याचा शब्दही पाळावा लागणार असल्याने मुश्रीफ यांनी अजित यांच्या पत्नी सुनीता यांना शेजारील संभाजीनगर बसस्थानक या प्रभागातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर अर्चना यांना पद्माराजे उद्यान या प्रभागातून उमेदवारी देण्यात येणार आहे. 

तिन्ही प्रभागांत एममेकांना 
मदत करण्याच्या सूचना 

संभाजीनगर बसस्थानकातून सध्या प्रतिनिधित्व करणारे महेश सावंत हे राजलक्ष्मीनगर प्रभागातून निवडणूक लढणार आहेत. या तिन्ही प्रभागांत तिघांनीही एकमेकांना मदत करावी, अशा सूचना श्री. मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. आज शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. आर. के. पोवार, राजेश लाटकर आदींसह राष्ट्रवादीचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.