चंदगडच्या नव्या पिढीला शेती उद्योगाचे वेध

सुनील कोंडुसकर
Monday, 30 November 2020

चंदगडच्या लाल मातीत काबाड कष्ट करून पिकवलेला शेती माल दलालांच्या हवाली करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला आता शेती उद्योगाचे वेध लागले आहेत.

चंदगड : चंदगडच्या लाल मातीत काबाड कष्ट करून पिकवलेला शेती माल दलालांच्या हवाली करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला आता शेती उद्योगाचे वेध लागले आहेत. खाण्याच्या बाबतीत सजग झालेला मध्यम व उच्च वर्ग आणि "सोशल मीडिया'च्या माध्यमातून मार्केटींगचे तत्व सोपे झाल्याने ही नवी पिढी मोठ्या आत्मविश्‍वासाने यात उतरली आहे. सातवणे (ता. चंदगड) येथे हा प्रयोग आकाराला येत आहे. त्यासाठी "चंदगड फार्म फ्रेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनी'ची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या घाणू ग्रुप ऑफ फार्म्स कंपनीचे मार्गदर्शन आहे. 

सहकारी तत्त्वावरील काजू प्रक्रिया उद्योग यशस्वी केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मोहन परब यांनी या नव्या प्रयोगाला हात घातला आहे. त्यासाठी गुडेवाडी (ता. चंदगड) येथील दिल्लीस्थित स्टार्ट अप इंडियाचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. सुरवातीला सुमारे सत्तर शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला आहे. सद्या हे सर्वजण एकाच गावातील असले तरी हळूहळू तालुक्‍याच्या इतर भागातील शेतकऱ्यांना त्यात सामावण्यात येणार आहे.

एका शेतकऱ्यांनी केवळ अर्धा एकर शेतीत विविध प्रकारचा भाजीपाला पिकवायचा. त्याला बाजारपेठ उपलब्ध करुन शेतकऱ्याला योग्य दर मिळवून देण्याची जबाबादरी कंपनी उचलणार आहे. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती, घेतली जाणारी पिके उत्तम दर्जाची असली तरी त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. अनेकदा दलालांकडून शेतकऱ्याला नागवले जाते. हा प्रकार टाळणे हा या कंपनीचा हेतू आहे. एका अर्थाने सहकारी तत्वावरच या कंपनीचे काम चालणार आहे. यासाठी डॉ. पाटील यांनी हैद्राबाद येथील घाणू ग्रुप ऑफ फार्म्स कंपनीचे अध्यक्ष प्रदीप घाणू यांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले आहे.

नुकतेच त्यांनी मोबाईल ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपलब्ध क्षेत्रात अधिक उत्पादन कसे घ्यायचे, मशागतीपासून ते लागवड, उत्पादन आणि विक्री पर्यंतचे मार्गदर्शन या कंपनीकडून होणार आहे. मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद यासारखी मोठी शहरे आणि तेथील रहिवाशी संस्था दृष्टीक्षेपात धरुन शेतीमाल विक्रीचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर पुढील यश अवलंबून असल्याचे मोहन परब यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चंदगडसह आजरा, गडहिंग्लज विभागात सहकारी तत्त्वावर शेती आणि शेतमाल विक्रीचा उद्योग भरभराटीस येईल असा विश्‍वास व्यक्त केला. 

ही काळाची गरज
सेंद्रिय उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यातून शेतकऱ्यांना सध्याच्या दरापेक्षा अधिक चांगला दर मिळू शकतो. एकेकाने शेती करण्याचे दिवस आता संपले. समुहाने "शेती उद्योग' करणे ही काळाची गरज आहे. 
- डॉ. परशराम पाटील, सल्लागार, स्टार्ट अप इंडिया 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The New Generation Of Chandgad Is Turning To Agriculture Industri Kolhapur Marathi News