अखेर निलेश साबळेचा 'त्या' प्रकारावर माफीनामा...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 March 2020

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता.

कोल्हापूर - मराठी मनोरंजन वाहिनी वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर संतप्त झालेल्या संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘‘लोकप्रियतेची हवा डोक्‍यात घुसली की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे. हे आक्षेपार्ह असून, निषेधार्ह आहे.’ दिग्दर्शक व वाहिनीने गैरकृत्याची माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

‘छत्रपती घराणे कलेचे आश्रयदाते असून, शाहू राजांनी कोल्हापूरचे कलानगरीत परिवर्तन केले. सयाजीराव गायकवाड यांचे योगदानही मोठे आहे. कलेसाठी स्वातंत्र्य व पोषक वातावरण आवश्‍यक असले तरी काहीही करावे, असा त्याचा अर्थ होत नाही. प्रतिमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ अशी खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती.

अखेर निलेश साबळेंनी मागितली माफी

दरम्यान, चुकीच्या पद्धतीने वापर केलेल्या प्रतिमेचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने इतिहासप्रेमींनी त्याचा खरपूस समाचार घेतला. दिग्दर्शकाने कोल्हापुरात येऊन माफी मागावी, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली. पण आता मौन बाळगून असेलला या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळेने अखेर एक व्हिडीओ पोस्ट करत माफीनामा सादर केला आहे. निलेश साबळे म्हणतो, "स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून…घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही माफी मागतो..." आता निलेश साबळेंच्या माफीनाम्यानंतर आता या वादावर पडदा पडला आहे....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Sable apologizes