मास्क नाही, तर वस्तूही नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

व्यापारी असोसिएशन, संघटनांची बैठकीत ग्वाही 
 

कोल्हापूर  : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क नो एन्ट्री ही मोहीम शहरात कठोरपणे राबवू, अशी ग्वाही चेंबर ऑफ कॉमर्ससह शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनास दिली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत चेंबर ऑफ कॉमर्स तसेच शहरातील विविध व्यापारी संघटनाची बैठक उपायुक्त निखिल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

 चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, ‘‘शहरातील सर्व व्यापारी मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही,’’ याबाबत कठोरपणे भूमिका घेतील. दुकानात गर्दी होणार नाही, यासाठी दुकानाबाहेर एक स्वतंत्र कामगार ठेवून मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करण्याची खबरदारी घेतील.’’
उपायुक्त निखिल मोरे म्हणाले, ‘‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही ही भूमिका व्यापारी बंधूंनी घ्यावी. प्रमुख बाजारपेठाच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांनी खरेदीसाठी शक्‍यतो दिवसा बाहेर पडावे.’’

हेही वाचा- घृणास्पद :  शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

इस्टेट ऑफिसर सचिन जाधव म्हणाले, ‘‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असून याबाबत महापालिका प्रशासनाने पाच पथके आणि केएमटीची स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. दिवाळीच्या काळात गाडी अड्डा येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे

.’’नगरसेवक किरण नकाते, चेंबर ऑफ कॉमर्सचे वैभव सावर्डेकर, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, जयंत गोयानी, प्रशांत शिंदे, अजित कोठारे, संदीप वीर, बबन महाजन, अनिल धडाम, संभाजी पोवार वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, बशीर मकानदार, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No mask no entry is the campaign kolhapur