भावा बिनधास्तच : ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, मास्क हनुवटीलाच 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा सोशल मीडियावर जनजागृती 
कोरोनाचा राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

कोल्हापूर : राज्याच्या इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासन, प्रशासन एकीकडे खबरदारी घेण्याचे आवाहन करत असताना शहरवासीय मात्र बिनधास्तच फिरत आहेत. ना तोंडावर मास्क, ना सामाजिक अंतर, तर अनेकांचे मास्क हनुवटीवरच असतात असे चित्र दिसते. कोरोनाबाबत बेफिकीर वागाल तर लॉकडाउन अटळ आहे, असे सांगण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. 

भाउसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी, छत्रपती शिवाजी चौक, करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक, माळकर तिकटी, सीपीआर, करवीर तहसील चावडी, लुगडी ओळ, ताराबाई रोड, बाबू जमाल परिसर, गंगावेस, पापाची तिकटी, बाजारगेट, कुंभार गल्ली, सोमवार पेठ, न्यू शाहूपुरी, विचारेमाळ सदर बाजार, राजारामपुरी, राजेंद्रनगर परिसर, सुधाकर जोशी नगर झोपडपट्टी, गंजीमाळ, रंकाळा टॉवर परिसर, कसबा बावडा हा वर्दळीचा भाग आहे. आजही मुख्य रस्त्यावर फेरफटका मारला असता बहुतांशी लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते. 

हेही वाचा- चप्पल आणि बूट निर्माण करणाऱ्या सर्वांनाच आयएसआय' मार्क गरजेचा;  कायद्याच्या अंमलबजावणीला  होणार सुरुवात

रस्त्याच्या बाजूला विनामास्क बिनधास्तपणे काहीजण गप्पांचे फड रंगवत बसलल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सकाळी तसेच सायंकाळी फिरायला येणाऱ्या मंडळी बेफिकीरी होती. कोरोनाचा विषाणू हा तोंडावाटे अथवा नाकावाटे जात असल्याने तोंडाला मास्क लावा असे वारंवार आवाहन केले जाते. सर्दी. ताप, अंगदुखी अशी प्राथमिक लक्षणे जाणवली तरी तातडीने उपचार घ्या असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. मात्र स्वतःहून लोक काळजी घेत नाहीत, तोपर्यत कोरोना कधी झपाट्याने पसरेल याचा नेम नाही असेही सांगितले जात आहे. कोरोना संपलाच असे गृहीत धरून काहीजण बिनधास्तपणे वावरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच बेफिकीरी कायम राहिल्यास लॉकडाउनचे संकट दिले आहेत. 

हेही वाचा-कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवेला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद

व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा सोशल मीडियावर जनजागृती 
कोरोनाचा राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना शासन, प्रशासन करत असले तरी लोकांत मात्र अजूनही गांभीर्य दिसत नाही. यावर मार्ग काढण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे या संदर्भातील जनजागृती सुरू केली आहे. "नाकाला मास्क लावणे हे, व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा बरे', "घरात राहणे हे आयसीयूत राहण्यापेक्षा चांगले', "काळजी घेणे हे उपचार घेण्यापेक्षा चांगले' अशा आशयाच्या संदेशांनी सोशल मीडियावर धूम उडवली आहे. याच पद्धतीचे यमराज यांचे एक चित्र फिरत असून त्यात "वरती जागा कमी आहे, काळजी घ्या रे' असा यमराज संदेश देत असल्याचे चित्र व्हायरल केले आहे.

संपादन- अर्चना बनगे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No mask no social distance many masks on the chin covid 19 marathi news