कोल्हापुरकरांना तेराव्या दिवशी दिलासा; दुपारपर्यंत एकही कोरोना पाॅझिटिव्ह नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

जिल्ह्यात मुंबई, पुण्यासह रेड झोन जिल्हे व परराज्यातून आलेल्या ५६७१ जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.

कोल्हापूर - गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना आज तेराव्या दिवशी जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. आज (दि. २६) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. त्यामुळे गेल्या जिल्हावासियांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, काल दिवसभरात ३७ बाधितांची भर पडली होती. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ वर पोचली आहे. काल अहवाल पॉझिटिव्ह आलेले सर्व जण अलगीकरण कक्षात असून त्यांना रात्री उशिरापर्यंत सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम सुरू होते. 

शिवाय काल कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या एकूण रुग्णांची संख्या २० वर पोचली आहे. दोन रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

काल दुपारी दीडच्या सुमारास २९ जणांचे तर सायंकाळी आठ जणांचे असे ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्व जण मुंबई, पुणेसारख्या रेड झोनमधून कोल्हापुरात आले होते. रेड झोनमधून येणाऱ्या सर्वांनाच किणी टोल नाक्‍यावरून थेट सीपीआरमध्ये आणण्यात आले होते. सीपीआरमध्ये स्वॅब घेऊन त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवले होते. आज ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

हे पण वाचा - ऑनलाईन शिक्षण चांगलेच ; पण शिक्षण खात्याने आधी याचा विचार केलाय का?

काल अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांत सर्वाधिक १६ जण आजरा तालुक्‍यातील आहेत. त्या खालोखाल शाहूवाडी तालुक्‍यातील १५ जण तर पन्हाळा तालुक्‍यातील तीन, भुदरगडमधील दोन तर राधानगरी तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे.  काल सहा जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यात नेसरी (ता. चंदगड) येथील दोन तर माणगाव, केर्ले (ता. शाहूवाडी), सातवे (ता. पन्हाळा), अडकूर (ता. चंदगड) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

हे पण वाचा - ... फक्त एवढेच शेतकरी ठरणार कर्जमाफीस पात्र ; या आहेत अटी
 

जिल्ह्यात मुंबई, पुण्यासह रेड झोन जिल्हे व परराज्यातून आलेल्या ५६७१ जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील प्रलंबित स्वॅबची संख्या वेगळी आहे. सर्वाधिक १३१६ अहवाल एकट्या गडहिंग्लज तालुक्‍यातील प्रलंबित आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क व डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत स्वॅबची तपासणी होते. 

तालुकानिहाय बाधितांची संख्या
आजरा- ३२, भुदरगड - ४९, चंदगड- २५, गडहिंग्लज - १३, गगनबावडा- ६, हातकणंगले- ४, करवीर - ११, कागल - ११, पन्हाळा - २०, राधानगरी - ४८, शाहूवाडी - ११९, शिरोळ - ५.

अन्य ठिकाणचे बाधित असे
इचलकरंजी पालिका - ६, जयसिंगपूर- ३, कुरुंदवाड - १, कोल्हापूर महापालिका - २०, इतर राज्यातील - ५ (पुणे-१, कर्नाटक- २, आंध्र प्रदेश-१, सोलापूर-१) एकूण ३७८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no more corona positive case 13th day in kolhapur maharashtra