अरेच्या... कोल्हापुरात चार दिवसात वाढली मास्क वापरणाऱ्यांची संख्या

युवराज पाटील  | Monday, 13 July 2020

मास्क न घातल्यास शंभर रूपयाची पावती फाडावी लागेल..., या धास्ती पोटी शहरात मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या तीन चार दिवसांपासून वाढ झाली आहे.

कोल्हापूर :  मास्क न घातल्यास शंभर रूपयाची पावती फाडावी लागेल..., या धास्ती पोटी शहरात मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या तीन चार दिवसांपासून वाढ झाली आहे. केएमटीचे सुमारे दोनशे कर्मचारी या कामी लावले गेले आहेत. शहरातील विविध प्रमुख चौकांत उभे राहून हे कर्मचारी मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. 

लॉकडाऊनमुळे केएमटी आर्थिक आरिष्टात सापडली आहे. रोंजदारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. केएमटी सुरळीत होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामी व्यस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात पोलिस प्रमूख चौकात थांबत होते. त्याच धर्तीवर हे कर्मचारी वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहत आहेत. एखाद्या वाहनचालकाने मास्क न लावल्यास त्यास रोखून शंभर रूपयांची पावती केली जाते. मास्क वापणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. प्रत्येक वाहनचालकाच्या तसेच रस्त्याने चालणाऱ्यांच्या तोंडी आता मास्क नजरेस पडत आहेत. 

एखाद्या गोष्टीची सक्ती केली जात नाही, तोपर्यंत त्याचे परिणाम दिसून येत नाहीत असे म्हंटले जाते. नेमकी हिच बाब मास्कच्या सक्तीच्या निमित्ताने निदर्शनास येत आहे. एरव्ही मास्क घालणे न घालणे ही ऐच्छिक बाब होती. भाजी मंडईत बसणारे विक्रेत्यांना मास्क तसेच हॅण्डग्लोजची सक्ती करण्यात आली होती. नागरिकांना मात्र अशी सक्ती नव्हती. केएमटीचे कर्मचारी जसे रस्त्यावर उतरले तशी सक्ती प्रत्यक्ष दिसून येऊ लागली. 

तीन दिवसात अडीच लाख दंड... 
मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे अशा कारवाईत 598 नागरिकांकडून 82 हजारांचा दंड वसूल झाला आहे. गेल्या तीन दिवसात दोन लाख 59 हजार इतका दंड वसूल झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत जशी वाढ होत आहे तसे महापालिकेने कारवाईसाठी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार