धक्कादायक ; वयोवृद्ध आजारी पतीला पेटवून वृद्धेने स्वत:लाही पेटविले 

old couple suicide in kolhapur chandgad
old couple suicide in kolhapur chandgad

चंदगड (कोल्हापूर) : वृद्ध आणि आजारी पतीला पेटवून एका वृद्धेने आत्महत्या केली. हा प्रकार कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे घडला. येथील लक्ष्मण रवळू पाटील (वय ९०) व त्यांची पत्नी पार्वती (८५) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद या दाम्पत्याच्या मुलानेच दिली आहे. त्यानुसार चंदगड पोलिसांनी मृत पार्वती यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. 

याबाबत चंदगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज पहाटे मुलगा पुंडलिक घरी आला असता ही घटना निदर्शनास आली. मृत दाम्पत्य काही वर्षांपासून जुन्या घरात राहत होते. लक्ष्मण यांना पहिल्या पत्नीपासून एक व दुसरी पत्नी पार्वती यांच्यापासून एक, असे दोन मुलगे आहेत. त्या दोघांनीही स्वतंत्र घरे बांधली आहेत. दोनशे मीटर अंतरातच ते सर्व जण राहत होते. मुलगा पुंडलिक त्यांची काळजी घेत होता. लक्ष्मण चार वर्षांपासून आजारी होते. पत्नी पार्वती त्यांची शुश्रूषा करीत होत्या.

वयोमानानुसार त्यांना सेवा करण्यास शरीर साथ देत नव्हते. 
आज पहाटे पतीच्या आजाराला आणि शुश्रूषेला कंटाळून त्यांनी प्रथम पतीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले. त्यानंतर स्वतःला पेटवून घेतल्याचे मुलगा पुंडलिक याने फिर्यादीत म्हटले आहे. भाजून गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख श्रीनिवास घाटगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद चंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नाईक तपास करीत आहेत. दरम्यान, मृत पार्वती यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com