धक्कादायक : कोरोनाने मयत झालेल्या वृध्दाच्या 'त्या' बाधित मुलाने सुमारे 200 जणांना दिलंय 'ते' औषध...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

शुक्रवारी नांदणीतील 75 वर्षीय वृध्दाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाल्याने नांदणी परिसर हादरला आहे.

शिरोळ - नांदणी ता. शिरोळ येथील कोरोनाच्या संसर्गामुळे मयत झालेल्या वृध्दाच्या नांदणीतील एका मुलाचा व कोल्हापूर येथील जावयाचा कोरोनाचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तथापी नांदणीतील त्या हॉस्पीटलमधील डॉक्‍टर तसेच त्या वृध्दाच्या घरातील अन्य कुटुंबियासह 14 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान 28 जुन रोजी त्या वृध्दाच्या घरातील एका मुलाने सुमारे 200 जनांना कुत्रे, मांजर, उंदीर, चावल्यानंतर दिले जाणारे देशी औषध दिले असल्याने या नागरिकांचाही शोध घेतला जात असुन काही जणांना होम कारंटाईन करण्यात आले आहे.

शुक्रवारी नांदणीतील 75 वर्षीय वृध्दाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाल्याने नांदणी परिसर हादरला आहे. या वृध्दाच्या घरातील दोन मुलापैकी एक मुलगा, तसेच जावई उपचारा दरम्यान सुश्रुषाकरीता त्यांच्याबरोबर होते. या दोघांचेही अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत. यामुळे नांदणी ग्रामपंचायतीने, वृध्दाचा मुलगा राहत असलेला माळभाग परिसर सील केला आहे. तथापी या वृध्दाच्या घरातील 11 अन्य सदस्यांचा तसेच नांदणीतील त्या हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांच्या घरातील चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

वाचा - कोल्हापूर जिल्ह्यात परत कोरोनाचा कहर सुरु ; 23 नवे कोरोना बाधित आले समोर...

दरम्यान त्या वृध्दाच्या दुसर्या मुलाने 28 जुन रोजी शिरोळ, मिरज, मालगाव, कोरोची, सांगली, इचलकरंजी, शिरढोण, जयसिंगपूर, रेंदाळ, गांधीनगर, कबनुर, टाकवडे, चिपरी, आष्टा, सावळी, हरीपुर, ताणंग, मजले, मंगसुळी, मणेराजुरी, अब्दुललाट, धरणगुत्ती, उदगाव, खटाव, घालवाड, कुटवाड, नृसिंहवाडी, कोथळी, तसेच नांदणीतील 30 अशा सुमारे 200 नागरीकांना कुत्रे, मांजर, उंदीर चावल्यानंतर दिले जाणारे औषध दिले आहे. यामुळे या नागरीकांचा शोधही प्रशासन घेणार आहे.

 

सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील कांही भागातून, कुत्रे, मांजर, व उंदीर चावल्यानंतर देशी औषध घेण्यासाठी या वृध्दाच्या घरी 28 जुन रोजी नागरिक आले होते. ही बाब समोर आली आहे. या नागरीकांनी कोरोनोची लक्षणे जाणवु लागताच स्वतःहून प्रशासनास कळविणे गरजेचे आहे. तालुक्‍यातील ज्या गावातील नागरीकांनी हे औषध घेतले आहे. त्या नागरीकांच्यावरती आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातुन लक्ष ठेवणार आहे. गरज भासल्यास त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.

- डॉ. पी.एस.दातार, तालुका वैद्यकिय अधिकारी  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man from Nandani has died due to corona infection