ऑनलाईन गुरू   

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

कोरोनाने सारे जग बदलले किंबहुना जगाला हादरवरून सोडले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक अडचणींना लोकांना सामोरे जावे लागले. मात्र, त्याचबरोबरीने काही सकारात्मक गोष्टीही घडल्या.

कोल्हापूर : कोरोनाने सारे जग बदलले किंबहुना जगाला हादरवरून सोडले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक अडचणींना लोकांना सामोरे जावे लागले. मात्र, त्याचबरोबरीने काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. त्यातील सर्वात महत्त्वाचा सकारात्मक बदल घडला, तो विविध प्रकारचे ज्ञान देणारे, मार्गदर्शन करणारे गुरू अधिक टेक्‍नोसॅव्ही झाले आणि त्यांनी ऑनलाईन माध्यमातून शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटकांबरोबर ऑनलाईन संवाद साधत त्यांना विविध टिप्स दिल्या. एरवी एखाद्या हॉलपुरते, विशिष्ट लोकांपर्यंत त्यांना आपले ज्ञान देता यायचे; पण ऑनलाईन माध्यमामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा कॅनव्हास जगभरात विस्तारला. 

मुलांची सर्जनशीलता वाढली... 
लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्या. सर्व प्रकारचे क्‍लासेस बंद झाले. मैदाने बंद होती आणि परिसरातून चालत किंवा अगदी सायकलवरून फिरायचे म्हटले तरी अनेक बंधने होती. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर काही पालकांनी मुलांना मोबाईलचा वापर करून विविध गोष्टी शिकवल्या; पण त्याचवेळी काही गुरूंनी मुलांसाठी म्हणून ऑनलाईन उपक्रम केले. पाचगाव पोस्टल कॉलनी परिसरात आनंदी बालभवन नावाने ऍक्‍टिव्हिटी सेंटर चालवणाऱ्या दीप्ती देशपांडे यांनी फेसबुकवरून "रोज रोज शिकू नवं काही' हा उपक्रम चालवला. दररोज त्या या माध्यमातून मुलांशी संवाद साधत विविध गाणी, गोष्टी, कोडी, कलाप्रकार शिकवायच्या. सलग 54 दिवस हा उपक्रम त्यांनी चालवला. त्या सांगतात, "हा उपक्रम चालवण्यापूर्वी अगोदर मी स्वतः स्टोरीटेलिंगचे तीन ऑनलाईन कोर्सेस केले. आवश्‍यक तांत्रिक माहिती जाणून घेतली आणि एकेक भाग फेसबुकवरून अपलोड करू लागले. बघता बघता राज्यभरातून त्याला प्रतिसाद मिळू लागला. केवळ मनोरंजन नव्हे, तर मुलांची सर्जनशीलता वाढावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यांची शब्दसंपत्ती वाढावी आणि ज्ञानेंद्रियांना चालना मिळावी, हाच उद्देश होता आणि तो नक्कीच साध्य झाला.'' 

आरोग्यविषयक जागरूकता वाढली..
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोग प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न झाले. साहजिकच त्यासाठी केवळ विविध प्रकारचे काढेच नव्हे, तर योग आणि ध्यानालाही अधिक महत्त्व आले. मात्र, योग व ध्यानाचे वर्गच बंद असल्याने हे वर्गही ऑनलाईन सुरू झाले. या क्षेत्रातील विविध संस्थांनी लाईव्ह प्रशिक्षणावर भर दिला आणि साहजिकच जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या समन्वयकांपासून ते स्वयंसेवकांपर्यंत सर्वांना अधिक टेक्‍नोसॅव्ही व्हावे लागले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी स्वतः काही लाईव्ह सेशन्स घेतली, तर जिल्हा पातळीवरही अशी सेशन्स आजही सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत सजग, खंबीर व आनंदी राहणे, प्रभावी नेतृत्व व संवाद कौशल्य, वेळेच्या व्यवस्थापनाबरोबरच शारीरिक, तसेच मानसिक सदृढता वाढवण्यासाठी त्यातून भर दिला. शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटकांसाठी योगा, ध्यान व श्‍वसनाच्या ऑनलाईन कार्यशाळा आजही सुरू असून पूर्वीपेक्षा आता लोकांत आरोग्यविषयक जागरूकता वाढली असल्याचे डॉ. अनिमा दहीभाते सांगतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Guru