दैवज्ञ समाजाची रक्षाविसर्जनानंतर एकच नैवेद्याची १५ वर्षांची परंपरा...

दैवज्ञ समाजाची रक्षाविसर्जनानंतर एकच नैवेद्याची १५ वर्षांची परंपरा...

कोल्हापूर : स्मशानभूमीत ठेवल्या जाणाऱ्या नैवेद्यातून अन्नाची नासाडी थांबायला हवी, असा कोल्हापुरातील दैवेज्ञ समाजाने पंधरा वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय स्तुत्य ठरलाय. रक्षाविसर्जनानंतर केवळ एकच नैवेद्य ठेवण्याचा दंडक समाजातील कुटुंबे पाळत असून, सकाळी नऊ वाजेपर्यंत रक्षाविसर्जनाचा विधी आटोपण्याचा नियमही तंतोतंत अमलात आणला जात आहे. या निर्णयाबाबत कोणाचीच तक्रार नसल्याने त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. 

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची प्रथा. रक्षाविसर्जनालाही पै-पाहुण्यांची गर्दी. चित्तेच्या जागेवरील रक्षा उचलल्यानंतर ती जागा शेणाने सारवायची. त्यानंतर त्या जागी नैवेद्यांचा खच पडायचा. कावळ्याने नैवेद्य शिवल्यानंतर काही नैवेद्य भिकाऱ्यांच्या पोटात. अन्यथा स्मशानभूमीत भटकणाऱ्या कुत्र्या-मांजरांच्या पोटात. उर्वरित नैवेद्य मात्र कोंडाळ्यात टाकून अन्नाची नासाडी. हे चित्र बदलण्यासाठी दैवेज्ञ समाजाने पंधरा वर्षांपूर्वी एक पाऊल पुढे टाकले. 

चित्तेच्या ठिकाणी ठेवलेला नैवेद्य मृत व्यक्तीपर्यंत पोचू शकत नाही, असा वैज्ञानिक विचार समाजाने केला. रक्षाविसर्जनासाठी अर्धा तास दिवस जात असल्याचेही समाजाच्या लक्षात आले. त्या ऐवजी आठ वाजण्यापूर्वीच स्मशानभूमीत जाऊन नऊपर्यंत विधी आटपण्याचा निर्णय झाला. ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत झालाय, त्याच्या कुटुंबीयांनीच केवळ नैवेद्य आणावा. अन्य पै-पाहुण्यांनी आणू नये, असा फतवाही निघाला. 

कोट- 
दैवज्ञ समाजातील बहुतांश लोक एकच नैवेद्य ठेवतात. अन्नाची नासाडी टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पंधरा वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाला कोणीच विरोध केला नाही. आता प्रत्येकाने अन्नाची नासाडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
- सुधाकर पेडणेकर, अध्यक्ष, दैवज्ञ समाज बोर्डिंग 
----------- 
चौकट 
दोन वर्षांतून एकदा स्नेहसंमेलन 
शहरात दैवज्ञ समाजाची संख्या सुमारे आठ हजार आहे. शेती, नोकरी, उद्योग, व्यवसायात समाजातील लोक आहेत. दोन वर्षांतून एकदा स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने दैवज्ञ बोर्डिंगमध्ये ते एकत्र येतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती, नानाशंकर शेठ यांच्या जयंतीला समाजातर्फे अभिवादन केले जाते. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊन वाटचाल करण्यास प्रोत्साहित केले जाते. 
----------- 
चौकट 
दैवज्ञ समाज बोर्डिंगची कार्यकारिणी अशी : 
अध्यक्ष - सुधाकर पेडणेकर, उपाध्यक्ष - मधुकर पेडणेकर, सचिव - विजय घारे, उपसचिव - श्रीकांत कारेकर, कोषाध्यक्ष - श्रीराम भुर्के, अधीक्षक - पी. के. आणवेकर, सदस्य - शेखर पाटगावकर, एकनाथ चोडणकर, मुरलीधर मसूरकर, रत्नाकर नागवेकर, गजानन भुर्के, गजानन नागवेकर, महेश पोतदार, किशोर कारेकर, महेश जामसांडेकर, सुनील बेळेकर, प्रवीण मालवणकर. 

"सकाळ' देणार पाठबळ 
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी "सकाळ'च्या पुढाकाराने राबवलेली "चला, पंचगंगा वाचवूया' ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. याच चळवळीतून अनेक नव्या संकल्पना पुढे आल्या आणि त्या यशस्वीही झाल्या. "मूठभर रक्षा श्रद्धेसाठी, उर्वरित शेतीसाठी' ही संकल्पना केवळ कोल्हापुरातच नव्हे तर आता राज्यभरात अनुकरणीय ठरते आहे. केस कापल्यानंतर केस नदीत जाणार नाहीत, याची खबरदारी घेत घाटावर केसासाठी कुंड ठेवण्यात आले आणि त्यालाही सर्वांचा प्रतिसाद मिळाला. आता त्याचा पुढील टप्पा म्हणून रक्षाविसर्जनासाठी ठेवल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये कमीत कमी पदार्थ असणारा एकच नैवेद्य ठेवण्याची संकल्पना सर्वानुमते पुढे आली आहे. या संकल्पनेचे स्वागत होत असून असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणाऱ्या कुटुंबांची माहिती "सकाळ'मधून प्रसिद्ध केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com