गडहिंग्लजला ऑनलाईन सभेवर विरोधक नाराज

Opponents Angry At Online Meeting In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Opponents Angry At Online Meeting In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : जनतेचे प्रश्‍न मांडताना अडचणी येत असल्याचे कारण सांगत विरोधकांनी पंचायत समितीच्या आज झालेल्या ऑनलाईन सभेबाबत नाराजी व्यक्त केली. जणू त्याचीच प्रचिती सभेच्या कामकाजातही दिसून आली. संपूर्ण कामकाजात अवघे सहाच प्रश्‍न उपस्थित झाले. त्यातील एक प्रश्‍न सभेबाबतच होता. दरम्यान, विरोधकांच्या मागणीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी पुढील सभा ऑफलाईन घेण्याचे आश्‍वासन दिले. सभापती रूपाली कांबळे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. 

गटविकास अधिकारी शरद मगर यांनी स्वागत केले. प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. शाळांच्या स्वच्छतेचा मुद्दा विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला. शाळा बंद आहेत म्हणजे त्या पाडताय का, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत; पण पुन्हा एकदा पत्र देण्याचे आश्‍वासन श्री. हलबागोळ यांनी दिले. शिक्षकांच्या कोरोना चाचणीकडे विजय पाटील यांनी लक्ष वेधले. आतापर्यंत 774 शिक्षकांची चाचणी झाली असून, एकही शिक्षक पॉझिटिव्ह नसल्याचे श्री. हलबागोळ यांनी सांगितले. 

बांधकाम विभागाच्या आढाव्यात हरळी-वैरागवाडी रस्त्याच्या दुरुस्तीचा मुद्दा विजय पाटील यांनी उपस्थित केला. सदरच्या रस्त्यावर मुरुम टाकला असल्याचे उपअभियंता एल. एस. जाधव यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांनी सुपर स्प्रेडरच्या तपासणीची माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी दुसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून कोविड रुग्णांसाठी 50 बेड आरक्षित ठेवल्याचे सांगितले. जयश्री तेली यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मास्क वापराचा मुद्दा उपस्थित केला. विजय पाटील यांनी वस्तीच्या गाड्यांबाबत प्रश्‍न उपस्थित केला. याशिवाय अन्य विभागांचा आढावा झाला. 

सभेवेळीच होते आठवण? 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचायत समितीची सभा ऑनलाईन घेतली जात आहे. त्यामध्ये काही प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत. मागील दोन सभेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता; पण विरोधकांना तांत्रिक अडचणींची आठवण नेमक्‍या सभेवेळीच होत असल्याचे दिसून येत आहे. मधल्या कालावधीत ऑफलाईन सभेसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा होताना जाणवत नाही. 

कुपोषणमुक्तीसाठी आवाहन... 
पंचायत समितीच्या सभेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ ऑनलाईन सहभागी झाले होते. जानेवारीपर्यंत जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गडहिंग्लज तालुक्‍याचे सर्वच विभागात चांगले काम आहे. गडहिंग्लज तालुका जिल्ह्यात सर्वप्रथम कुपोषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com