राज्यातील शाळांना आजपासून  तीन आठवडे सुटी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

आधीच शाळा सुरू न करण्याचे व विद्यागम कार्यक्रम थांबविण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.

बंगळूर : अनेक शिक्षकांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी रविवारी 12 ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत राज्यातील सर्व शालेय उपक्रमांसाठी तीन आठवड्यांच्या मध्यावधी सुट्टीचे आदेश दिले. 

मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी निवेदनात म्हटले आहे, शिक्षकांना कोविड-19 चे संक्रमण झाल्याचे आपल्याला प्रसार माध्यमांद्वारे समजले. म्हणूनच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्यापासून (ता. 12) 30 ऑक्‍टोबरपर्यंत तीन आठवड्यांसाठी मध्यावधी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केले आहेत. आधीच शाळा सुरू न करण्याचे व विद्यागम कार्यक्रम थांबविण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत सरकारी शाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपासच्या ठिकाणी जाऊन शिक्षकांनी शालेय शिक्षण चालू ठेवले होते. 

या महिन्याच्या सुरुवातीस शाळांसाठी 2020-21 मध्ये 3 ते 26 ऑक्‍टोबर दरम्यान होणारी मध्यावधी सुट्टी सरकारने रद्द केली होती. त्यात म्हटले होते की शासकीय शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच खासगी शाळांमधील ऑनलाइन वर्गांसाठी विद्यागम कार्यक्रम सुरूच राहणार आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मध्यवधी सुट्ट्या रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. 

हेही वाचा- Photo : कोकणात मुसळधार ; मळ्यातच भात कुजण्याची भिती -

कर्नाटकमधील शाळा पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पालकांना यासंदर्भात आश्वासन दिले की, याबाबत लवकरच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाईल. 
मुलांचे आरोग्य आणि भविष्य लक्षात घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांतील सर्व नेते, तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलाविली जाईल, असे ते म्हणाले होते.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order of three weeks mid term leave for all school activities in the state