आमची मुले जरग विद्या मंदिरातच शिकणार... 

संदीप खांडेकर
बुधवार, 1 जुलै 2020

महापालिकेच्या लौकिकात भर घालणाऱ्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिराचे अपुऱ्या वर्ग खोल्यांचे दुखणे अद्याप संपलेले नाही. 

कोल्हापूर : महापालिकेच्या लौकिकात भर घालणाऱ्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिराचे अपुऱ्या वर्ग खोल्यांचे दुखणे अद्याप संपलेले नाही. सातवीतील 168 विद्यार्थी यंदा आठवीच्या वर्गात प्रवेश करणार असली तरी केवळ 40 विद्यार्थ्यांनाच जरग विद्या मंदिरचे दरवाजे खुले राहणार आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना अन्य शाळांत प्रवेश घ्यावा लागणार आहे. 

या स्थितीत उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मात्र, जरग विद्यामंदिरातच आमची मुले शिकणार, असा पवित्रा घेतला आहे. त्यातून शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या जरग विद्यामंदिरची पटसंख्या अठराशे आहे. पहिली, दुसरी, तिसरी, पाचवी व सहावीच्या प्रत्येक सहा, तर चौथी पाच, सातवी चार व आठवीची एक तुकडी आहे. वर्गखोल्यांची संख्या 36 आणि एकूण वर्ग 42 अशी इथली स्थिती आहे. एकाच वर्गात पार्टिशन उभारून वर्ग भरवले जात आहेत. यंदा सातवीच्या वर्गातून 168 विद्यार्थी आठवीच्या वर्गात प्रवेश करत आहेत. 

गतवर्षीपासून आठवीचा वर्ग विद्यामंदिरात सुरू झाला असला तरी केवळ शिष्यवृत्तीसाठी 40 विद्यार्थ्यांना वर्गात ठेवले जाणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ तोंडी दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची घोषणा केली होती. पर्याय म्हणून राजमाता जिजामाता हायस्कूलचे स्थलांतर विद्यामंदिरात करून दहावीपर्यंतच्या शिक्षणाची विद्यार्थ्यांची गरज भागवली जात आहे. मात्र, विद्यामंदिरातील विद्यार्थीच दहावीपर्यंत शिकवणार का?, हा प्रश्‍न आहे.

विद्यामंदिराला वर्गखोल्या अपुऱ्या असल्या तरी महापालिका प्रशासन त्याकडे पाहायला तयार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिरचे विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत चमकत असले तरी विद्यामंदिराला विशेष दर्जा अद्याप मिळालेला नाही. अन्य शाळांप्रमाणेच विद्यामंदिराची गणती केली जाते. त्यातूनच वर्गखोल्यांचा प्रश्‍न सुटू शकलेला नाही. 

दर्जेदार शिक्षणामुळे विद्यामंदिरात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा रांगा लागतात. अपुऱ्या वर्ग खोल्या असल्याने शिक्षकांना शिकवायचे कसे, असा प्रश्‍न पडतो. विद्यामंदिराला अजून वीस वर्गखोल्यांची आवश्‍यकता आहे. 
- उत्तम गुरव, मुख्याध्यापक, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर 

 

गुणवत्तापूर्ण शिक्षण जरग विद्यामंदिरात दिले जाते. इथले शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईने लक्ष देतात. दहावीपर्यंत आमची मुले इथेच शिकावीत, अशी आमची इच्छा आहे. आठवीच्या प्रवेशासाठी आम्ही आमच्या पाल्याचा अन्य शाळेसाठी विचार करू शकत नाही. 
- राधिका जाधव, जरगनगर 

दृष्टिक्षेप 
- सातवीतील 168 विद्यार्थी आठवीत प्रवेश करणार 
- केवळ 40 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार 
- उर्वरीत विद्यार्थ्यांना अन्य शाळेचा आसरा घ्यावा लागणार 
- एकाच वर्गात पार्टिशन करून विद्यार्थ्यांना शिक्षण 
- वर्गखोल्या 36 आणि एकूण वर्ग 42 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our children will learn in Jarg Vidyamandir ...