तीस वर्षे स्वप्नांचा पाठलाग अन्‌ 43 व्या वर्षी मॅट्रीक परीक्षा पास! स्वच्छता कर्मचाऱ्याची अशीही धडपड

सुनील कोंडुसकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मुळचा भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील संजयची कानडी (ता. चंदगड) ही सासरवाडी. नातेवाईकांच्या संपर्कातून तो चंदगडला आला आणि छोटी मोठी कामे करीत असताना दहा वर्षापूर्वी चंदगड ग्रामपंचायतीकडे स्वच्छता कर्मचारी म्हणून रुजू झाला.

चंदगड : परीक्षेसाठी वर्गाच्या दरवाजात गेलो आणि लाजेनं चुर्र झालो. आपल्यापेक्षा कितीतरी लहान मुलांत बसून परीक्षा कशी द्यायची हा प्रश्‍न मुख्य परीक्षेपेक्षा मोठा होता. थोडा वेळ दरवाजातच उभा राहिलो. मनाचा हिय्या केला आणि बाकावर जाऊन बसलो. सुरवातीला मुले आश्‍चर्यचकीत झाली. काही वेळात वातावरण निवळलं. त्यानंतर मात्र आत्मविश्‍वासाने पुढच्या प्रश्‍नपत्रिका सोडवल्या. नुकताच निकाल लागला आणि सुमारे तीस वर्षे "मॅट्रीक' होण्याचं मनात घोळणार स्वप्न पुरं झालं. येथील नगरपंचायतीकडील स्वच्छता कर्मचारी संजय खांडेकर "सकाळ'शी बोलत होता. वयाच्या 43 व्या वर्षी त्याने हे यश संपादन केले. 

मुळचा भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील संजयची कानडी (ता. चंदगड) ही सासरवाडी. नातेवाईकांच्या संपर्कातून तो चंदगडला आला आणि छोटी मोठी कामे करीत असताना दहा वर्षापूर्वी चंदगड ग्रामपंचायतीकडे स्वच्छता कर्मचारी म्हणून रुजू झाला. सहावी नापास असलेल्या संजयच्या मनात आपण शिकलो नाही याची खंत होती. अनेकदा तो सहकाऱ्यांना बोलून दाखवायचा. त्यातूनच 17 क्रमांकाचा फॉर्म भरुन परीक्षा देण्याचा निर्णय झाला.

गडहिंग्लज येथील माळी हायस्कूलमधून त्याने ही परीक्षा दिली. परीक्षा द्यायचे निश्‍चित झाल्यावर अभ्यासाला सुरवात झाली. गल्लीतील दहावीच्या मुलांच्या वह्या-पुस्तके घेऊन जमेल तसे वाचन करायचे. कधीतरी शिक्षकांना भेटून अभ्यासातल्या शंका समजून घ्यायच्या. इंग्रजी आणि गणिताने मोठा त्रास दिला. परंतु निर्णय ठाम असल्यामुळे माघार नव्हती. सर्वात महत्वाचा प्रश्‍न होता तो वेळेत प्रश्‍नपत्रिका सोडवण्याचा. लिहिण्याची सवय कधीच सुटली होती.

परीक्षेच्या आधी दोन महिने लिखाणाचा सराव सुरु केला. पुस्तकातील पानेच्या पाने वहीत उतरायला लागली. नगरपंचायतीतील सर्व सहकाऱ्यांनी सातत्याने मनोधैर्य वाढवले. 42 टक्के गुण मिळाले. त्याचा आनंद मात्र शब्दात व्यक्त करू शकत नाही. शिक्षण हे प्रगतीचा महत्वाचे माध्यम असल्याचे लक्षात आले आहे. यापुढे शिक्षण सुरुच ठेवणार असल्याचे सांगताना संजयच्या डोळ्यात आत्मविश्‍वासाची चमक दिसली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passed Matriculation Examination In 43rd Year Kolhapur Marathi News