रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात 64 टक्के, तर गडहिंग्लज उपविभागात 74 टक्के... वाचा सविस्तर बातमी

अजित माद्याळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

या उपविभागातील तिन्ही तालुक्‍यात मुंबईकरांची संख्या तीस हजारावर आहे. याशिवाय इतर जिल्ह्यातून आलेल्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे प्रशासनासह जनतेची चिंता वाढली. या दरम्यान आढळलेले रुग्ण हे प्रथम संपर्कातील अधिक असल्याने स्थानिक संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्‍यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला बरे होण्याचे प्रमाणही 74 टक्‍क्‍यांवर पोहचल्याचे दिलासादायक चित्र आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात 64 टक्के आहे. त्यापेक्षाही दहा टक्के जादा प्रमाण या उपविभागातील आहे. उपविभागातील आरोग्य यंत्रणेचे हे यश म्हणावे लागेल. कोरोनाच्या महामारीत ही सकारात्मक बाजू समोर आल्याने प्रशासनासह जनतेलाही दिलासा मिळाला आहे. परंतु, अजूनही संकट टळलेले नसून जनतेने अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. 

या उपविभागातील तिन्ही तालुक्‍यात मुंबईकरांची संख्या तीस हजारावर आहे. याशिवाय इतर जिल्ह्यातून आलेल्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे प्रशासनासह जनतेची चिंता वाढली. या दरम्यान आढळलेले रुग्ण हे प्रथम संपर्कातील अधिक असल्याने स्थानिक संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. समूह संसर्ग अद्याप सुरू झाले नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. 

गेल्या महिन्याभरात रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यासह गडहिंग्लज, आजरा व चंदगडमध्ये स्थानिक लॉकडाउन कडक झाले. शहरांमधील प्रभाग समितीसह ग्रामीण ग्राम दक्षता समितींच्या पदाधिकाऱ्यांनी सुरूवातीला शासन नियमांची कडक अंमलबजावणी केली. त्यावेळी घेतलेल्या खबरदारीने आज समूह संसर्ग रोखण्यात यश आल्याचे सांगण्यात येते. अन्यथा, याआधीच समूह संसर्ग सुरू झाला असता. आज गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात जिल्ह्यातील इतर ठिकाणांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे.

प्रशासनाच्या पुढाकाराने संसर्ग आटोक्‍यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच ही संख्या नियंत्रित ठेवण्यात यश येत आहे. बाधित रुग्ण आढळत असले तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्या प्रकृतीत बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती चांगली असल्याचे समोर येत आहे. जसे मुंबईत बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांपेक्षा झोपडपट्टीतील नागरिकांची प्रतिकार शक्ती आहे. यामुळे जनतेच्यादृष्टीने ही बाब दिलासादायक अशीच आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Patient Recovery Rate Is 64 Per Cent In The Country And 74 Per Cent In Gadhinglaj Sub-Division Kolhapur Marathi News