अंदाजपत्रकाबाबत लोक म्हणतात... 

अंदाजपत्रकाबाबत लोक म्हणतात... 

कोल्हापूर  : महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात काय असावे?, यासाठी शहरवासीयांच्या अपेक्षांना स्थान देत काही दिवस लोकांच्या अपेक्षा "सकाळ'मधून प्रसिद्ध करण्यात आल्या. तसेच आगामी अंदाजपत्रकात लोकांच्या अपेक्षांची पूर्ती व्हावी यासाठी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यासाठी आवाहन केले होते. याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंदाजपत्रकाबाबत लोक म्हणतात. 

ज्येष्ठांना मोफत औषधे द्या 
शहरात एक लाख ज्येष्ठ नागरिक आहेत, तर जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सहा लाखांवर आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदा या तिन्ही यंत्रणांनी ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सरकारी रुग्णालयात ज्येष्ठांना मोफत उपचार होत असले तरी औषधांचा खर्चही मोठा आहे. एका नागरिकाला सरासरी पाचशे ते एक हजार असा औषधोपचाराचा खर्च होतो. नागरिकांच्या हे कुवतीबाहेर आहे. त्यामुळे ज्येष्ठांना मोफत औषधे द्यावीत. 
- डॉ. मानसिंगराव जगताप. 

सुनियोजित रस्ते करा 
शहरातील रस्ते करताना ते सुनियोजित असावेत. रस्ते नवे केले आणि खोदले असे प्रकार अनेकदा होतात. त्यामुळे पैशाचा अपव्यय होतो. परदेशात या बाबीकडे कटाक्षाने लक्ष देऊन नियोजनबद्ध रस्ते केले जातात. तसेच ते आपल्याकडेही व्हावेत. शहरातील बागा, खुल्या जागा या प्रदूषणविरहीत असाव्यात. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्‍वास घेता यावा. शहरात चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे असावीत. मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांचाही बंदोबस्त व्हावा. 
- डॉ. विलासराव देशमुख. 

पायाभूत सुविधांकडे लक्ष हवे 
शहरात पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून होणाऱ्या कामांना प्राधान्य हवे. सुसज्ज रस्ते, चांगली स्वच्छतागृहे, स्वच्छ आणि मुबलक पाणी, साफसफाई, स्वच्छता, पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. पे-ऍण्ड पार्किंगची सोय केल्यास चांगल्या प्रकारे सोय होईल. तसेच महापालिकेलाही यातून उत्पन्न मिळेल. 
- राजू वाली, सामाजिक कार्यकर्ते. 

ऑनलाईन सुविधा हव्यात 
घरफाळा व पाणीपट्टीची रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न करावा. पैसे भरण्यासाठी विशिष्ट दिवसांची सूट दिल्यास नागरिक स्वत:हून ऑनलाईन बिले भरतील. त्यामुळे महापालिकेकडे नियमित पैसे जमा होतील व त्यातून शहरात चांगल्या योजना राबविणे शक्‍य होतील. नागरिकांच्या तक्रारी ऑनलाईन स्वीकाराव्यात व त्याचे निराकरण तत्काळ करावे. 
- रवींद्र यरनाळकर, सहाय्यक कक्ष अधिकारी यशवंतराव चव्हाण, मुक्त विद्यापीठ. 

गॅस दाहिनीचे काम लवकर करा 

शहरात गॅस दाहिनीचे काम लवकर पूर्ण करावे. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार होतील. गॅसवरील दहनही मोफत व्हावे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता पंचगंगा स्मशानभूमी अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण होते. शेजारील जमीन घेऊन पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण करणे आवश्‍यक आहे. 
- दीपक पोलादे. 


नैसर्गिक संपत्तीची हानी टाळावी 
सध्या शहरात अंत्यविधी केला जातो. त्यासाठी लाकूड आणि शेणींचा वापर होतो. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची हानी होते. तसेच प्रदूषणही होते. उंच इमारतीत राख पडणे, दुर्गंधी पसरणे आदी समस्या जाणवतात. अंत्यसंस्कारासाठी इलेक्‍ट्रिक फर्नेस ऍटोमेटिकचा वापर केल्यास सर्व समस्या सुटतील. रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेल्या वाहनांच्या बाबतीतही योग्य निर्णय घ्यावा. या वाहनांची योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने महापालिकेने विल्हेवाट लावावी. 
- प्रकाश मालाडकर. 


खुल्या जागा विकसित करा 
महापालिकेच्या खुल्या जागा, ओव्हरब्रिजखालची जागा या कचऱ्याने व्यापलेल्या आहेत. नागरिकांकडून येथे कचरा टाकला जातो; पण या जागा जर लोकसहभागातून अथवा खासगीकरणातून विकसित केल्या तर शहर सौंदर्यात भर पडेल. स्पीड ब्रेकरवरसुद्धा पांढरे पट्टे मारावेत. साहजिकच स्पीड ब्रेकर आहेत, हे लोकांना कळायला हवे. 
- स्नेहल जाधव. 

उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष नको 
आपले शहर तुलनेने लहान असूनही विकास का होत नाही? महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. ज्या विभागातून उत्पन्न मिळते त्या विभागाकडे लक्ष द्यावे. केशवराव भोसले नाट्यगृहातून उत्पन्न मिळते; पण तेथे कुशल तंत्रज्ञ नाही. तंत्रज्ञ भरायला काय अडचण आहे, हे महापालिकेने सांगावे. कुशल तंत्रज्ञाची भरती करावी. 
- भरत गुरव. 

शैक्षणिक सुविधांकडे लक्ष हवे 
महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्यावे. शहरातील अनेक शाळांची अवस्था दयनीय आहे. इमारतीची दुरुस्ती करावी, रंगरंगोटी करावी व इतर सुविधा द्याव्यात. नुकतीच महापालिका शिक्षण मंडळाने राजर्षी शाहू समृद्ध शाळा अभियानाची सुरवात केली आहे. त्यामुळे शाळांचा चेहरामोहरा बदलायला सुरवात होणार आहे. शैक्षणिक दर्जाही वाढायला हवा. यासाठी बजेटमध्ये ठोस उपाययोजना करावी. 
- डॉ. जे. के. पवार, निवृत्त प्राचार्य. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com