जरा हटके: असे बनवा ‘पेरू जेली स्वीट’

peru jelly recipe made by chitra deshpande kolhapur
peru jelly recipe made by chitra deshpande kolhapur

कोल्हापूर : कल्पकता कुठल्याही क्षेत्रात वापरली तरी त्यातून निर्माण होणारी कलाकृती ही उत्कृष्टच होते. वेगवेगळ्या कलाकृतीत कल्पकता वापरली जाते तशीच ती खाद्यपदार्थ बनविण्यातही असते. रोजचाच खाद्यपदार्थ; मात्र त्याच्या बनविण्याच्या पद्धतीत जरा हटके प्रयोग केले तर त्याची चवही भन्नाट असते. खरी कॉर्नर येथील चित्रा देशपांडे यांनीही अशाच पद्धतीने ‘पेरू जेली स्वीट’ हा पदार्थ कल्पकतेतून बनविला आहे. पेरूच्या नेहमीच्या स्वादाला नवी चव आणत त्यांचा हा पदार्थ खवय्यांसह सुगरणींनाही भुरळ घालत आहे.


चित्रा देशपांडे यांना नानाविध पदार्थ बनविण्याचा जणू छंदच. १९९२ मध्ये त्यांनी पुणे येथे जाम, जेली, सरबत बनविण्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर असे पदार्थ तयार करण्याची आवड त्यांनी जपली. स्वयंपाकघरात अशा विविध रेसिपी तयार करत एकदा बागेतच पेरूंनी बहरलेल्या झाडाने त्यांचे लक्ष वेधले. पेरूपासून वेगळा तसेच दीर्घकाळ टिकणारा पदार्थ तयार करू शकतो का, असा प्रश्‍न त्यांना पडला. त्यांनी जेली तयार करण्याचा घाट घातला. त्यांचा हा प्रयत्न यशस्वीही झाला. 

विशेष म्हणजे, पेरू जेली स्वीट दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांनी कोणतेही रासायनिक घटक वापरले नाहीत. पूर्वी घरातील सदस्यांना पुरेल इतकीच ‘पेरू जेली स्वीट’ त्या बनवित होत्या. 
२००५ मध्ये त्यांनी गोखले कॉलेजमध्ये उद्यानविद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. तेथे ‘फळ प्रक्रिया’ या विषयावर त्यांनी पेरूपासून जेली हा पदार्थ सादर केला. हा आगळावेगळा पदार्थ सर्वांनाच आवडला. त्यानंतर त्यांनी आवळा कॅंडी, आवळा वडी, आवळा पेपर असे विविध पदार्थ इतरांना शिकविण्यासाठी पुढाकार घेत मार्गदर्शन वर्गही सुरू केले.

अशी करा ‘पेरू जेली स्वीट’
पिकलेल्या पेरूचे तुकडे करून ते बुडतील इतके पाणी घालून उकडायचे. पूर्ण उकडल्यानंतर तुपाच्या गाळणीने गाळायचे. उकडलेल्या पेरूच्या पल्पमधील बिया काढून टाकायच्या. त्यानंतर साखर, लोणी, मीठ आणि लिंबू पिळायचा. हे मिश्रण शिजवायचे. कढईच्या कडेने सुटत आल्यानंतर त्यात बिटाचा  रस घालायचा. हे मिश्रण घट्ट होत आल्यानंतर मऊ गोळे झाले की तूप किंवा लोणी लावलेल्या ताटावर पसरायचे. त्यानंतर ते वडीप्रमाणे चिरायचे. ‘पेरू जेली स्वीट’ तयार...

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com