
चंदगड तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम पार पडला. 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींचे काही प्रभाग आणि काही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
चंदगड : तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम पार पडला. 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींचे काही प्रभाग आणि काही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. सदस्य म्हणून निवडून आलेल्यांना आता सरपंचपदाचे वेध लागले आहेत. ज्या गावात सर्वसाधारण जागेसाठी हे पद आरक्षित होईल तिथे मोठी रस्सीखेच पाहायला मिळेल. सरपंचपदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर होताच तत्पूर्वीपासून निवड होईपर्यंत आपल्या गटाच्या सदस्यांना सहलीवर नेण्याचे नियोजन आखले जात आहे. कोणताही धोका पत्करायचा नाही म्हणून स्थानिक गट नेत्यांकडून ही खेळी खेळली जात आहे.
या टप्प्यात निवडणूक झालेल्या बहुतांश ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कालावधी सुमारे वर्षभरापूर्वी संपला होता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे गेल्याने सुरवातीचा काही काळ विद्यमान सरपंच, सदस्यांना तर त्यानंतरच्या काळात प्रशासक नियुक्त करून कारभार सुरू होता, मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गावच्या राजकारणाने गती घेतली होती. निवडणूक निकालानंतर यश, अपयशाची चर्चा रंगली आहे. ज्या गावात बहुमत झाले तिथे आता सरपंच पदासाठी अंतर्गत रस्सीखेच होईल.
काठावरचे बहुमत असलेल्या गावांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. जिथे अपक्षांना घेऊन बहुमत करावे लागणार आहे तिथे त्या उमेदवारांचे महत्त्व वाढले आहे. अर्थात सरपंचपदाचे आरक्षण काय येणार यावर हा सत्तेचा खेळ रंगेल. ज्या गावात हे पद सर्वसाधारण जागेसाठी खुले होईल तिथे या पदासाठी रस्सीखेच होईल. एकूण परिस्थिती पाहता स्थानिक गट नेत्यांवर जबाबदारी वाढली आहे.
सदस्यांकडून आणाभाका
बहुमत अबाधित ठेवून आपल्या गटाचाच सरपंच झाला पाहिजे, याची जोडणी घालताना गटातील इतर उमेदवार नाराज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. निवडणुकीवेळी मतदारांकडून आणभाका घेतल्या गेल्या. आता निवडून आलेल्या सदस्यांनाही विश्वास दाखवण्यासाठी ग्रामदैवतांच्या आणाभाका घ्याव्या लागतील.
संपादन - सचिन चराटी
kolhapur