गोव्याहून पायपीट करत चाललेल्या हनमंताला आजऱ्यात "यांच्या'कडून मिळाला माणुसकीचा अनुभव

रणजित कालेकर
Monday, 10 August 2020

"तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी' या संत तुकारामांच्या ओळींचा प्रत्येय एका निराधाराला शुक्रवारी (ता.7) अनुभवायला आला.

आजरा : "तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी' या संत तुकारामांच्या ओळींचा प्रत्येय एका निराधाराला शुक्रवारी (ता.7) अनुभवायला आला. कडेवर आपल्या तान्ह्या बाळाला घेवून पाऊस झेलत गोव्याहून पायपीट करत चाललेल्या हनमंताला खाकी वर्दीतील देवत्वाची प्रचिती आली. पोलिस नाईक सचिन वायदंडे असे त्या खाकी वर्दीतल्या माणसाचे नाव. गवसे (ता. आजरा) येथील चेक पोस्टवर आज दुपारी दोनच्या सुमाराला माणुसकीचा सुखद अनुभव हनमंतला मिळाला. 

गोष्ट अशी की, हनमंत मुळचा सोलापुरचा. तो कामानिमित्त गोवा येथे होता. त्याच्या जीवनात येथे मोठे स्थित्यांतर घडले. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यात कोरोनामुळे त्याला कोठे रोजगारही मिळेना. त्यामुळे त्याने गावची वाट धरली. खिशात पैसे नसल्याने तो चालत सोलापूरकडे निघाला होता. गवसे चेक पोस्ट नजीक आल्यावर पोलिस नाईक सचिन वायंदडे यांना तो भन्नंग अवस्थेत चालत जात असलेल्या दिसला.

वायंदडे यांनी दुपारी जेवणासाठी सोडलेला डबा त्याला दिला. त्याची दुःखद कहाणी ऐकून घेतल्यावर वायदंडेना गलबलून आले. त्याचा तान्हा बाळ खंडेराय याला खाऊ दिले. त्याचे अश्रू पुसले. त्याला आधार देत जीवनाविषयी चांगल्या गोष्टी सांगितल्या. आर्थिक मदत देवून इचलकरंजीला जाणाऱ्या गाडीत बसवले. त्यांच्यातील माणूसकीचे दर्शन चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांना घडले. 

 

संपादन - सचिन चराटी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Police Gave A Helping Hand In Ajara Kolhapur Marathi News