प्रा. श्रीपाल जर्दे यांचा  आयुष्याचा संघर्षमय प्रवास 

Pvt. Shripal Jarde's life's struggling journey
Pvt. Shripal Jarde's life's struggling journey

कोल्हापूर  : ""एमपीएडचा अभ्यासक्रम सुरू करायचा होता. तत्कालीन कुलगुरूंकडे चार वेळा निवेदने दिली. निवेदनाचे उत्तर मिळत नव्हते. एका कार्यक्रमात गाठून निवेदन दिले. त्याचा त्यांना राग आला. कार्यक्रम मध्येच सोडून ते निघून जाण्याच्या तयारीला लागले. 
एका कार्यकर्त्याने त्यांच्या निषेधाची घोषणाही दिली. चूक नसताना त्यांचा रोष आला. आमची चूक असेल तर आपण द्याल, ती शिक्षा भोगण्यास तयार आहोत, असे आम्हीच त्यांना पत्र लिहिले. लोकशाहीच्या मार्गाला यश आले आणि कुलगुरूंनी अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे परिपत्रक काढले'', प्रा. श्रीपाल जर्दे आयुष्यातील संघर्षमय प्रसंग उलगडत होते. अंगात सफारी, डोळ्यावर चष्मा अन्‌ खांद्याला अडकवलेली शबनम पिशवी हा त्यांचा पेहराव. 15 पुस्तकांच्या या लेखकाचे वय अवघे 77, अनुभवांचा संग्रह मोठा असल्याने भरभरून बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य. 
श्री. जर्दे वर्गात पहिल्या किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणारे विद्यार्थी. त्यांचे मूळ गाव कुंभोज. त्यांची अकरावीची परीक्षा जयसिंगपूर केंद्रात होती. आई आजारी असल्याने परीक्षेला जाण्याची त्यांची मन:स्थिती नव्हती. आईच्या शब्दाला मान देऊन अखेर त्यांनी परीक्षा दिली. आईचा आजार बळावत राहिला. घरी परतल्यानंतर चार दिवसांनी आईचे निधन झाले. निकालात श्री. जर्दे जयसिंगपूर केंद्रात दुसऱ्या, तर शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. पुढील शिक्षणासाठी वडिलांचे मन तयार नव्हते. नातलगांनी वडिलांची मनधरणी केल्यानंतर सीपीएड, 
एनडीएस, बीएड, बीपीएड, एम. ए, एमपीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी नवा लढा दिला. खेळाडूंचा शारीरिक भत्ता कमी, क्रीडा शिक्षकांना पीएचडी सोय नाही, या कारणावरून त्यांनी कऱ्हाडमधल्या इंटरझोन कबड्डी स्पर्धेवर बहिष्कार टाकला. कुलगुरूंचे मन वळेपर्यंत त्यांनी हार मानली नाही. बीपीएडचा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्याखेरीज नोकरी मिळणार, देणार कोण?, प्रश्‍न होता. अखेर कुलगुरूंनी परिपत्रक काढल्यानंतर एमपीएडच्या अभ्यासक्रमाला ग्रीन सिग्नल मिळाला. 
महाद्वार रोडवरच्या हायस्कूलमध्ये ते क्रीडाशिक्षक म्हणून नोकरीस होते. शिपायासह क्‍लार्कचे काम त्यांना करावे लागे. क्‍लार्कचा चार्ज अन्य कोणाकडे तरी द्या, असे पत्र देऊन ते बीएडच्या अभ्यासक्रमात त्यांनी लक्ष घातले. चार महिन्यांनंतर नोकरीत काढून टाकल्याचे पत्र त्यांना संस्थेकडून मिळाले. पुन्हा त्यांनी जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार केली व ते संस्थेत हजर झाले. सहीसाठी मस्टर मिळत नव्हते. ते निवेदन घेऊन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे जात होते. अखेर संस्थेला त्यांना नोकरीत सामावूनही घ्यावे लागले. पुढे ते महावीरमध्ये रुजू झाले. 


रोजचा योगा आनंदी जगण्याचे रहस्य आहे. आहारावर नियंत्रण असून, सुका मेवा व दूध नाश्‍ता आहे. ध्यान-धारणा व योगनिद्रेला महत्त्व देतो. जिवंत आहे, हाच आनंदाचा क्षण आहे, असे मानून जगतो. 
- प्रा. श्रीपाल जर्दे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com