आता रायबाग-कुडचीचे दुपरीकरण

महेश काशीद
Wednesday, 25 November 2020


लोंढा-मिरज प्रस्ताव; अधिकाऱ्यांकडून पाहणी

बेळगाव : रायबाग ते चिक्कोडी या दरम्यान निर्मित 13.94 किलो मीटर लांबीच्या रेल्वे दुपरीकरणाची पाहणी रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त (सीआरएस) ए. के. राय यांनी आज (ता.25) केली. लोंढा-मिरज रेल्वे दुपदरीकरणाचे काम 2015-16 मध्ये सुरु झाले असून, 2019 मध्ये घटप्रभा-चिक्कोडी रेल्वे दुपरीकरण पूर्ण झाले आहे. यात चिक्कोडी ते रायबाग रेल्वे दुपरीकरणाची आता भर पडली. प्रकल्पासाठी शासनातर्फे 1,191 कोटी मंजूर झाले आहेत. 

पुणे-मिरज-लोंढा रेल्वे दुपदरीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या 5 वर्षांपासून काम सुरू आहे. पैकी चिक्कोडी ते रायबागपर्यंत पूर्ण झालेल्या नवीन रेल्वे रुळाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. रेल्वे रुळाची निर्मिती, ताशी 130 किलो मीटर रेल्वे धावू शकते का? थांब्यांचा दर्जा आदी बाबींची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सकाळी साडे नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पाहणी चालली. यावेळी रेल्वे सुरक्षा विभागाचे उपायुक्त श्री श्रीनिवास, रेल्वेचे सीएओ के. सी. स्वामी, हुबळीचे अतिरिक्त विभागीय नियंत्रण अधिकारी विश्‍वास कुमार, हुबळी रेल्वे विभागाचे सीई टी. व्ही. भुषण, जी. शांतीरामन आदींसह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक अधिकारी, प्रवाशी उपस्थित होते. 

हेही वाचा- जरा हटके: असे बनवा ‘पेरू जेली स्वीट’ -

आता रायबाग-कुडचीचे दुपरीकरण 
चिक्कोडी-रायबाग रेल्वे मार्गावरून आता प्रवाशी, मालवाहून रेल्वे धावतील. विविध छोटे-मोठे पूल, 4 भुयारीमार्ग आहेत. मार्गावरून दोन रेल्वे ये-जा करू शकतील. 2019 मध्ये घटप्रभा-चिक्कोडी 16 किलो मीटर लांबीचे दुपरीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे लोंढा-मिरज रेल्वे दुपरीकरणांपैकी घटप्रभा ते रायबाग या दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. आता यापुढे रायबाग-कुडची या दरम्यान रेल्वे दुपरीकरणाचे काम सुरु होईल आणि यावर्षी ते पूर्ण करण्याची तयारी सुरु आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raibag Chikodi railway double track completed