...तर केंद्र सरकारला रस्त्यावर आणू ; राजू शेट्टी यांचा इशारा  

raju shetti altimeter tractor morch sangali to kolhapur
raju shetti altimeter tractor morch sangali to kolhapur

कोल्हापूर - चुकीचे कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अदाणी-अंबानींचे हस्तक असणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना उध्दवस्त करणारे कृषी कायदे रद्द झाले पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली ते कोल्हापूर दरम्यान 80 किलोमीटर अंतरावर ट्रॅक्‍टर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. दिल्लीतील आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर हिच फौज दिल्लीच्या दिशेन कुच करेल अशा इशाराही श्री शेट्टी यांनी दिला. 

शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन कोल्हापूर येथील दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन मोर्चा विसर्जित करण्यात आला. सांगली येथून निघालेला मोर्चा जयसिंगपूर, हातकणंगलेमार्गे कोल्हापुरातील दसरा चौकात मोर्चा विसर्जित केला. यावेळी, प्रत्येक गावात या मार्चाचे जंगी स्वागत करण्यात आले. दसरा चौक येथे श्री शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

श्री शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे आहेत. याच उद्योजकांनी राजकीय पक्षांना गुलाम बनवले आहे. त्यांच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले जात आहे. मात्र, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे तात्काळ रद्द करावे, अन्यथा केंद्र सरकारलाच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. प्रसंगी बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू, सरकारला सळो की पळो करून सोडले जाईल. दिल्लीत कृषी कायद्याला विरोधासाठी प्रजासत्ताकदिनी शेतकरी ट्रॅक्‍टर परेड करणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे होते, पण रेल्वेचा मार्ग बंद केला आहे. दक्षिणेकडील शेतकरी येऊ नये यासाठी वाहने रोखली आहेत. त्यामुळे आम्ही इथे ट्रॅक्‍टर मोर्चा काढतोय. केंद्राने कृषी कायदे लादू नयेत. कृषी कायद्याला विरोध करणारे मुठभर शेतकरी असल्याचे सरकार भासवत आहे. राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र केंद्र सरकार इंग्रजांप्रमाणे वागत आहे. कवडीमोलाने शेतीमाल खरेदी करून चौपट दराने विक्री होईल. कायद्याने आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार सरकार करत आहे. वीज बिलाबाबतही सरकारची भूमिका चुकीची आहे.''यावेळी, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रविण जनगोंडा, विक्रम पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, सौरभ शेट्टी उपस्थित होते. 
  

 गावागावात स्वागत  
ट्रॅक्‍टरवर फलक, ऊस व संघटनेचे झेंडे तसेच शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे फलकही लावण्यात आले होते. दरम्यान, सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत येत असताना प्रत्येक गावागावात या मोर्चा स्वागत फटाक्‍या फोडून करण्यात आले. तसेच, माजी खासदार शेट्टी यांना फेटा बांधून त्याचे स्वागत करुन प्रत्येक गावातील दहा ते बारा ट्रॅक्‍टर मोर्चात सहभागी होत राहिले. 

 वाहूकीची कोंडी  
मोर्चा सहभागी झालेल्या शेकडो ट्रॅक्‍टरमुळे तावडे हॉटेल ते सीबीएस स्टॅंडपर्यंतचे रस्तावर काही काळ वाहतूकीची कोंडी निर्माण झाली. तावडे हॉटेलपासून आत आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहत अधिकच भर पडला. जोर-जोराच्या घोषणा देत शहरवासियांचे लक्ष वेधले. 

 सजवलेले ट्रॅक्‍टर  
ट्रॅक्‍टरवर ऊस, संघटनेचे झेंडे, विविध आशयाचे फलक लावून सजविण्यात आले होते. तसेच, कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली होती. यामध्ये सर्व कंपन्यांच्या ट्रॅक्‍टरसह छोटा ट्रॅक्‍टर चालवत आलेल्या तरुणीनेही सर्वांचे लक्ष वेधले. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com