नाही होय म्हणत - म्हणत अखेर शेट्टीच फायनल 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

चार दिवसांपासून विधान परिषदेच्या जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अंतर्गत वाद उफाळून आला होता.

जयसिंगपूर : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या उमेदवारीवरून ‘स्वाभिमानी’तील मतभेद अखेर पेल्यातील वादळ ठरले. विधान परिषदेच्या जागेसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे आज रात्री नाव निश्‍चित करण्यात आले. जयसिंगपूर येथे झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले. यावेळी उमेदवारीचे दावेदार जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक आणि स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील उपस्थित होते.  

चार दिवसांपासून विधान परिषदेच्या जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अंतर्गत वाद उफाळून आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत श्री. शेट्टी यांनी बारामतीत उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे कळविल्यानंतर वादाला प्रारंभ झाला होता. मादनाईक व प्रा. पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून आपणच दावेदार असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून स्वाभिमानातील हेवेदावे चर्चेत आले. सोशल मीडियावर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. श्री. शेट्टी यांनी कार्यकर्त्यांकडून सुरू असणाऱ्या मतभेदावर नाराजी व्यक्त करून नात्यातील अंतर जपण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानीमधील अंतर्गत वाढते हेवेदावे लक्षात घेता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री संयुक्त बैठक घेऊन वादावर पडदा टाकला. 

यावेळी डॉ. श्रीवर्धन पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, अजित पवार, मिलिंद साखरपे, भरत बॅंकेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे उपस्थित होते. यापुढेही स्वाभिमानी एकसंघ असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आक्रमकपणे लढा देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

हे पण वाचा - Video - थक्क करणारा तिचा प्रवास...! इंटेरियर डिझायनर तरुणी अन्‌ चहाची टपरी...

 

 

केवळ गैरसमजुतीतून मतभेद निर्माण झाले होते; मात्र बैठकीनंतर ते दूर झाले आहेत. स्वाभिमानी एक संघ आहे आणि राहील.
- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetti council candidate final from swabhimani shetkari sanghatana