तिलारी घाटात चालकाचा अतिउत्साह जीवावर बेतणारा

Rash Driving Dangerous In Tilari Ghat Kolhapur Marathi News
Rash Driving Dangerous In Tilari Ghat Kolhapur Marathi News

चंदगड : महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाटाची निवड केली जाते. अशास्त्रीय पध्दतीने बांधलेल्या या घाट मार्गावरून खासगी वाहतुकीला परवानगी नसताना गेली तीस-पस्तीस वर्षे वाहने धावतच होती. दोन वर्षापूर्वी लोकाग्रहास्तव रितसर परवानगी देण्यात आली. पाटबंधारे खात्याकडून हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. रस्त्याचा दर्जाही सुधारला. मात्र घाटाची रचना विचारात घेता चालकाचा अतिउत्साह प्रवाशांच्या जिवावर बेतणारा आहे. 

चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच कर्नाटकचा बेळगाव परिसर यांना कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी तिलारी घाट आणि आंबोली घाट मार्गे असे दोन मार्ग आहेत. तिलारी घाटामुळे सुमारे तीस किलो मीटर अंतर वाचते. त्यामुळे या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. चाळीस वर्षापूर्वी तिलारी वीज निर्मिती प्रकल्पाचे साहित्य ने-आण करण्यासाठी म्हणून हा घाट बांधला गेला. त्याला शास्त्रीय निकष नव्हते. संबंधित ठिकाणापर्यंत साहित्य नेता यावे एवढाच उद्देश होता. घाट उतरताना तीव्र उतार तर चढताना तीव्र चढ, त्याच वेळी यु आकाराची वळणे आहेत. नवख्या आणि अति उत्साही चालकांसाठी ती खूपच धोकादायक आहेत. विशेषतः अवजड वाहनांनी गतीवर नियंत्रण ठेवूनच ही वळणे पार करावी लागतात. वीस वर्षापूर्वी बोअरवेल मशीनची गाडी याच पॉईटवरुन घाटात कोसळून बारा जणांचा मृत्यू झाला होता.

सिमेंट वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. काही अपघात होता होता टळले. बुधवारी (ता. 19) झालेल्या एसटीच्या अपघातानंतर चालकांचे कारनामे चर्चेत येत आहेत. भरधाव वाहन चालवणे, बेफिकीरी, उध्दट उत्तरे देणे असे प्रकार एसटी चालकांकडून वाढले आहेत. आपल्यावर प्रवाशांची जबाबदारी आहे याचे भानच नसल्याची स्थिती आहे. यासंदर्भात एसटी प्रशासनाने खबरदारी न घेतल्यास भविष्यात मोठा अनर्थ ओढवू शकतो. अपघाताचे प्रमाण वाढल्यास घाटातील वाहतुकीला पुन्हा बंदी येऊ शकते. 

अति उत्साही स्वभावच कारणीभूत
तिलारी घाट रस्त्याची रुंदी विचारात घेता वाहन चालवताना अडचण येत नाही. परंतु वळणावर वेग मर्यादित ठेवायला हवा. आत्तापर्यंत घाटात झालेल्या अपघातांचा अभ्यास केल्यास चालकांचा अति उत्साही स्वभावच कारणीभूत असल्याचे दिसते. 
- श्रीशैल नागराळ, सिव्हील इंजिनिअर व ग्रामस्थ, तिलारीनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com