
विशेष म्हणजे, कसलीही भिती न बाळगता ग्राहकांनीही चिकनची खरेदी केली.
कोल्हापूर : बर्ड फ्लुच्या साथीने धास्तावलेले पोल्ट्रीधारक अन् चिकन विक्रेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र दर कमी केलेले नाहीत. बर्ड फ्लुचा जिल्ह्यात कोणताही प्रादुर्भाव नसल्याने शहरातील मटण मार्केटमध्ये आज चिकन विक्री 100 ते 130 रुपयांनी झाली. तर मटण 600 रुपये किलो होते. विशेष म्हणजे, कसलीही भिती न बाळगता ग्राहकांनीही चिकनची खरेदी केली.
बर्ड फ्लू म्हणजे, एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू. हा विषाणूची बाधा फक्त कोंबड्यांनाच होत नाही, तर अन्य प्राणी, पक्षी, मनुष्य यांनाही होते. एचफाईव्हएनवन असे नाव असणारा हा विषाणू बर्ड फ्लू म्हणून ओळखला जातो. भारत सरकारने देशातील 11 राज्यांमध्ये बर्ड फ्लुची साथ असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये बुऱ्हाणपूर, राजगड, दिंडोरी, छिंदवाडा, मंडला, हर्दा, धार, सागर, सतना ही मध्यप्रदेशातील गावे तर डेहराडून, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरयाना, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तराखंड, छत्तीसगड आदी राज्यात बर्ड फ्लु पसरला आहे, असे वृत्त सरकारने दिले आहे.
हेही वाचा - 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून रसिकांनी लुटला आनंद
असे असले तरी राज्यामध्ये पुणे, मुंबई सोडले तर कोल्हापूर जिल्ह्यात बर्ड फ्लुची साथ नाही. कुठेही कोंबडी, कावळा, पाणपक्षी मृत झाल्याची नोंदही शासनाकडे, महापालिकेकडे झालेली नाही. त्यामुळे चिकनचे दर कमी होतील, असे वाटले होते. मात्र आज रविवारीही हे दर 100 ते 130 रुपयांच्या दरम्यान होते. यातही स्किन विथ, स्किन काढलेले अन् भाता काढलेले चिकनचे दर स्थिर होते.
"ग्राहकांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. कुठेही कोंबड्या मृत झाल्याचे वृत्त आमच्यापर्यंत आलेले नाही. चिकनचे दरही स्थिर आहेत. 100 अंशापर्यंत पाण्यात चिकन टाकल्यानंतर कोणताही विषाणू तगत नाही. त्यामुळे न घाबरता, न शंका घेता चिकन घ्यावे आणि खावे."
- विजय कांबळे, कोल्हापूर खाटीक समाज, अध्यक्ष
हेही वाचा - मतमोजणी होणार असून निवडून कोण येणार, याबद्दल पैजाही लागल्या आहेत
संपादन - स्नेहल कदम