किरण पोटे यांचा "कल्टी'  मराठी सिनेमा पुरस्काराचा मानकरी 

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 29 July 2020

नाशिक येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत दिला जाणारा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके राष्ट्रीय गोल्डन कॅमेरा ऍवॉर्ड येथील लेखक, दिग्दर्शक किरण पोटे यांच्या "कल्टी' या सिनेमाला मिळाला आहे.

कोल्हापूर : नाशिक येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत दिला जाणारा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके राष्ट्रीय गोल्डन कॅमेरा ऍवॉर्ड येथील लेखक, दिग्दर्शक किरण पोटे यांच्या "कल्टी' या सिनेमाला मिळाला आहे. कलापूरच्या शिरपेचात यानिमित्ताने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, या सिनेमाने एकूण सात पुरस्कारांवर नाव कोरले आहे. 
किरण पोटे, सरूड (ता. शाहूवाडी) गावचा. कोल्हापुरात आल्यानंतर शालिनी सिनेटोनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम सुरू केले आणि त्यातूनच कला क्षेत्रातील गोतावळा वाढत गेला. पुढे अभिरुची नाट्य संस्थेच्या माध्यमातून रंगभूमीवर अनेक प्रयोग केले. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करायचे, हा संकल्प मनाशी ठरवून एका बॅगनिशी थेट मुंबई गाठली. 
विविध पंधरा ते सोळा सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिका केल्यानंतर दिग्दर्शक जयसिंग ठाकूर यांनी दिग्दर्शनाची संधी दिली आणि "नऊ महिने नऊ दिवस' या सिनेमासाठी पहिल्यांदा क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर विविध "होणार सून मी ह्या घरची', "माझे पती सौभाग्यवती' आदी मालिकांसाठीही क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले. हा सारा प्रवास सुरू असतानाच लेखनालाही प्रारंभ झाला आणि पहिली शॉर्टफिल्म लिहिली ती "चिंध्या'. शिवाजी उद्यमनगरातील चिंध्या विकणाऱ्या महिला आणि राजर्षी शाहू वसाहतीतील महिला व त्यांच्या संसाराच्या गाड्यावर बेतलेल्या या शॉर्टफिल्मलाही विविध पुरस्कार मिळाले. त्यानंतर पूर्ण लांबीचा लेखक व दिग्दर्शक म्हणून केलेला पहिला सिनेमा म्हणजे "कल्टी'. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न 2011 मध्ये पूर्ण झाले. महेंद्रसिंग धोनीनं मारलेला विजयी षटकार आणि त्यानंतर तेंडुलकरला खांद्यावर बसवून टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर मारलेली प्रदक्षिणा, आजही साऱ्यांना आठवते. याच सामन्यातील तो षटकार आणि तो चेंडू या मध्यवर्ती संकल्पनेवर हा चित्रपट बेतला असून, तो ग्लॅमरपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य असते, असा संदेश देतो. चित्रपटात शशांक शेंडे, योगेश सोमण, सागर कारंडे, साईनाथ मुदणकर यांच्या भूमिका असून, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, बालकलाकार, कला दिग्दर्शन, कॅमेरामन, गीतकार, सहायक अभिनेता आदी पुरस्कारांसाठी या सिनेमाची निवड झाली. 

संजय हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलापुरात कला प्रवास सुरू झाला. आता तो यशस्वितेच्या एका टप्प्यावर असला, तरी भविष्यात आणखी काही चांगल्या कलाकृती साकारायच्या आहेत. नवीन वर्षात आणखी दोन सिनेमांवर काम सुरू होईल. 
- किरण पोटे