देशातील पहिले महाविद्यालय : केआयटीत ‘बीआयएम टेक्‍नॉलॉजी’ अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

‘यूजीसी’ची मान्यता; बीआयएम टेक्‍नॉलॉजीचे प्रशिक्षण देणारे
 

कंदलगाव (कोल्हापूर) : केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत ‘बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग’ या एक वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळाली. त्याचा प्रस्ताव जून २०२० मध्ये सादर केला होता. यासाठी लॉकडाउन काळात स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, केआयटी आणि बीआयएम टेक्‍नॉलॉजी ऑस्ट्रेलिया यांच्यात व्हर्च्युअल मीटिंगद्वारे सामंजस्य करार झाला. दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हा बांधकाम उद्योगाशी निगडित अद्ययावत अभ्यासक्रम तयार केला. शुक्रवारी (ता. ११) यूजीसीने त्यांच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाला मान्यता दिल्याचे जाहीर केल्याची माहिती ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी दिली.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रगत राष्ट्रांमध्ये १० वर्षांपासून सुरू असून भारतीय बांधकाम क्षेत्रात याची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामुळे बांधकाम करताना होणारी माहिती देवाणघेवाणच्या पद्धती, निर्णय क्षमता आणि कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होईल, असे मत या अभ्यासक्रमाचे नोडल ऑफिसर प्रा. रोहन नलवडे यांनी मांडली. अभ्यासक्रमासाठी ३० विद्यार्थी प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाली आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी पदविका व स्थापत्य, आर्किटेक्‍चर, मेकॅनिकल, पर्यावरण अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल. यामध्ये प्रशिक्षणाबरोबर इंटर्नशिप व नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याची जबाबदारी बीआयएम टेक्‍नॉलॉजी, ऑस्ट्रेलिया व इतर इंडस्ट्री पार्टनर्सना देण्यात आली आहे.

हेही वाचा- कारखान्यांची होणार कसरत : ट्रक-ट्रॅक्‍टर, बैलगाड्या मिळणे अवघड -

केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, 
सचिव दीपक चौगुले व महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार, स्थापत्य विभाग प्रमुख प्रा. मोहन चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले. या अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये स्थापत्य विभागाचे प्रा. रोहन नलवडे व बीम टेक्‍नॉलॉजीचे संचालक विक्रम मोहिते यांचा सहभाग होता. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.

दृष्टिक्षेपात अभ्यासक्रम

 प्रगत राष्ट्रांमध्ये १० वर्षांपासून वापर    

भारतीय बांधकाम क्षेत्रात मागणी 

 ३० विद्यार्थी प्रवेश क्षमता                

 नोकरीची सहज संधी

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recognition of UGC The first college in the country to impart BIM technology training