दरड कोसळल्याची अफवा ...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांचा हेलपाटा, वाचा काय घडले चंदगड तालुक्‍यात 

सुनील कोंडुसकर | Wednesday, 5 August 2020

मिरवेल (ता. चंदगड) येथे दरड कोसळली असून त्यात एक व्यक्ती मृत झाल्याचा संदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रांताधिकारी, तहसिलदार, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवकांना देण्यात आला.

चंदगड ः मिरवेल (ता. चंदगड) येथे दरड कोसळली असून त्यात एक व्यक्ती मृत झाल्याचा संदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रांताधिकारी, तहसिलदार, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवकांना देण्यात आला. कोसळणाऱ्या पावसाची तमा न करता सर्व टीम तातडीने तयार झाली. ऍम्ब्युलन्स, पोलिस फाट्यासह सर्वजण मिरवेल परिसरात पोहोचले परंतु तसे काही घडले नसल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी दौलत देसाई तत्परतेने चंदगडच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी प्रांताधिकारी पांगारकर मिरवेल परिसरात पोहोचल्या होत्या. अफवा असल्याचे त्यांनी कळवले. तोपर्यंत देसाई चंदगडमध्ये पोहचले होते. थोडा वेळ तहसिल कार्यालयात थांबून ते पुन्हा कोल्हापूरला परतले. जिल्हाधिकारी कार्यालयाला कोणीतरी चुकीचा संदेश दिल्याने प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ झाली. 

गेले दोन दिवस तालुक्‍यात पावसाचा जोर आहे. आजही पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळत होत्या. त्यातच दुपारी साडे बाराच्या सुमारास प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणावरे यांच्यासह तालुक्‍यातील आपदा मित्रांना ही माहिती देण्यात आली. एक जण मृत असल्याचे कळाल्यामुळे घटनेचे गांभीर्य मोठे होते. पारगड किल्याच्या पायथ्याचा हा परिसर दूर्गम असल्यामुळे पोलिस फौजफाट्यासह ऍम्ब्युलन्सही सोबत घेण्यात आली. तातडीने ही टीम मिरवेल परिसरात पोहोचली. परंतु त्या परिसरात असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. स्थानिकांनीही याला दुजोरा दिला. 

पंधरा दिवसापूर्वी या भागात दरड कोसळली आहे. परंतु काही नुकसान झाले नाही. तरीही अधिकाऱ्यांनी परिसरात फिरून खात्री करुन घेतली. अखेर ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वजण माघारी परतले. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतेच विभागातील तरुण, तरुणींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले असून त्यापैकी बहुतांश स्वयंसेवक या टीममध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी एक प्रकारे ही रंगीत तालीम ठरली. 

संपादन - सचिन चराटी 

विधानसभेची वर्षपूर्ती ः आठ आमदारांना घरी बसवलेला निकाल

कोल्हापूर ः राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता, लोकसभेत आघाडीचे झालेले पानिपत, जिल्ह्यात युतीचे तब्बल आठ आमदार, कॉंग्रेसमध्ये मरगळ तर राष्ट्रवादीत आहे त्या जागा राखण्याचे आव्हान, अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच तब्बल आठ विद्यमान आमदारांना घरी बसवणारा निकाल जिल्ह्यातील जनतेने दिला. त्यातही युतीच्या आठपैकी तब्बल सात आमदारांचा पराभव, हेही एक या निकालाचे वैशिष्ट्य. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उद्या (ता. 24) वर्षपूर्ती होत असताना राज्यात सर्वाधिक आमदार असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले.