पानटपरी चालवायचीय मग महिन्याला दहा हजार दे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

तो एक साधा तरुण. रोजीरोटीसाठी पानटपरी चालवायचा. मात्र चार खंडणीबहाद्दरांनी त्याच्याकडे महिन्याला 10 हजार खंडणी मागितली. ती दिली नाही म्हणून घरात घुसून त्याच्यासह दोन महिलांना मारहाण केली.

कोल्हापूर ः पानटपरीच्या व्यवसायासाठी 10 हजार खंडणी न दिल्याच्या रागातून चौघांनी घरात घुसून तरुणासह दोन महिलांना मारहाण केली. त्यांच्या घरातील साहित्यासह मोटारसायकलची तोडफोड केली. हा प्रकार सायंकाळी सुधाकर जोशीनगरात घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद जखमी आकाश सिद्धलिंग पट्टल (वय 26) यांनी दिली. 
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः सचिन गायकवाड, प्रभाकर गायकवाड, सहदेव काबंळे, अंतेश कांबळे (सर्व रा. सुधाकर जोशीनगर) अशी आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती, आकाश पट्टल सुधाकर जोशीनगरात राहतात. त्यांच्या भावाची याच भागात "आराध्या' नावाची पानटपरी आहे. याच भागात राहणारा सचिन व प्रभाकर गायकवाड हे दोघे संशयित आकाश यांच्याकडे गेले. दोघांनी त्यांना पानपटपरीचा व्यवसाय करायचा असेल, तर दर महिन्याला 10 हजार रुपयांचा हप्ता द्यावे लागेल अशी मागणी केली; पण हा हप्ता देण्यास आकाश यांनी विरोध केला. त्यामुळे ते दोघे चिडून होते. याच कारणातून आज सायंकाळी सचिन, प्रभारकर गायकवाड, सहदेव, अंतेश कांबळे हे चौघे संशयित आकाश यांच्या घरात घुसले. चौघांनी आकाश यांना पानटपरीचा आजच्या आज 10 हजार रुपये हप्ता दे नाहीतर व्यवसाय करायचा नाही अशी धमकी दिली. त्यानंतर आकाश यांच्यासह त्यांच्या आई व मावशीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. घरातील प्रापंचिक साहित्यांची मोडतोड करून दारात लावलेल्या मोटारसायकलचीही तोडफोड केली. याप्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त नागरिक व महिलांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. याबाबत जखमी आकाश पट्टल यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार चौघा संशयितावर खंडणीची मागणी, मारहाण, धमकी, आदी गुन्हे दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To run a leaflet then give ten thousand a month kolhapur marathi news