esakal | इस्लामपुरात ‘रयत क्रांती’ विकास आघाडी बनवून लढेल
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor Nishikant Patil press conference sangli

सदाभाऊ खोत ः नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे नाव न घेता टीका

इस्लामपुरात ‘रयत क्रांती’ विकास आघाडी बनवून लढेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : रयत क्रांती संघटना महाडिक गटासोबत विकास आघाडी बनवून इस्लामपूर नगरपालिका निवडणूक लढवेल. मागील निवडणुकीत ज्याच्यासाठी पायात भिंगरी बांधुन फिरलो, त्याची आमची भेटसुद्धा होत नाही. यावेळी सर्वसामान्यांना नेहमी भेटणारे उमेदवार उभे करणार आहे, असा टोला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लावला. 

श्री. खोत यांनी आज येथे पदवीधर निवडणूक प्रचाराची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. उद्या(रविवारी) कोतोली (ता.पन्हाळा) येथे पाच संघटनेचे उमेदवार प्रा.एन.डी.चौगुले यांच्या प्रचाराचा प्रारंभाचा मेळावा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री खोत म्हणाले,‘‘पदवीधर निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत. भाजपचे आम्ही घटक पक्ष आहोत. त्यांनी बोलवले तर आम्ही जाऊ मात्र आता राजकारणात अलीकडे धनदांडगे, पै-पावणे, जहागीरदार असे बरेच चेहरे दिसत आहेत. राजकीय पक्ष त्यांच्याच मागे लागले आहेत. पदवीधर निवडणुकी प्रमाणेच आम्ही इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीतही विस्थापित मंडळीसाठी प्रस्थापितां विरोधात लढत देऊ.’’


ते म्हणाले,‘‘  आमचे उमेदवार एन. डी. चौगुले यांनी शिक्षक परिषदेत २० ते २५ वर्षे काम केले आहे. प्राध्यापक संघटनेत, राहुरी  कृषी विद्यापीठात कृषी सदस्य म्हणून काम केले. ’’ 
यावेळी श्री. चौगुले यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, संघटनेचे पदाधिकारी, विनायक जाधव, लालासो पाटील, रामभाऊ सावंत, अतुल पाटील उपस्थित होते.


तर सांगलीत ऊस परिषद
श्री खोत म्हणाले,‘‘ केंद्राने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावी, अन्यथा आंदोलन करू. कारखानदारांनी पाहिल्या हप्ता योग्य जमा न केल्यास सांगली जिल्ह्यात भव्य ऊस परिषद घेऊ असेही श्री. खोत यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

go to top