त्याला व्हायचे होते IAS... पण नियतीने असा घात केला...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सरोजला आयएएस अधिकारी व्हायचे होते. म्हणूनच त्याने मोटारसायकलीवर ध्येयवेडा, असे लिहिले होते. त्या खालीच तिरंगात आय. ए. एस. लिहिले होते. याच ध्येवेड्याचे ध्येय आज अपुरेच राहिले.

कोल्हापूर - त्याला एमपीएससी-यूपीएससी क्रॅक करायची होती. अधिकारी बनण्याचे त्याचे ध्येय होते. म्हणूनच त्याने दुचाकीवर ‘ध्येयवेडा आयएएस’ असे लिहिले होते; मात्र आज दुपारी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पडवळवाडीजवळ झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि या ध्येयवेड्यांचे ध्येय अपुरेच राहिले; मात्र तिघा मित्रांची दोस्ती शेवटच्या श्‍वासापर्यंत अबाधित राहिली. सरोज तानाजी पोवार (वय २१, रा. मोरेवाडी, ता. करवीर. जि. कोल्हापूर, मूळ जयसिंगपूर) असे या ध्येयवेड्याचे नाव आहे.

जुन्या मित्रांसोबत तो आलता पन्हाळा ट्रीपला

सरोज तानाजी पोवार हा मूळचा जयसिंगपूर येथील. त्याचे वडील तानाजी पोवार हे एलआयसीमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वीच त्यांनी कोल्हापुरातील मोरेवाडी परिसरात बंगला बांधला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. त्यापैकी सरोज हा एक होता. पोवार कुटुंबीय आज सिंहगड (पुणे) येथे पर्यटनासाठी गेले होते, मात्र एकटाच सरोज मित्रांसोबत पन्हाळ्यास जाण्यासाठी घरातून सकाळी निघाला होता.

वाचा - भीषण अपघातात पन्हाळा दशर्नासाठी निघालेले तीन मित्र ठार...

ध्येयवेड्याचे ध्येय अपुरेच राहिले

त्याला प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा होती. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. तो दिसायला एकदम स्मार्ट होता. जयसिंगपुरातील जुन्या मित्रांसोबत तो आज सकाळीच पन्हाळ्याला गेला होता. परत येताना केर्लीजवळ अपघात झाला आणि तो जागीच ठार झाला.
घटनास्थळी त्याची पडलेली मोटारसायकल आणि त्या मोटारसायकलीवर लिहिलेल्या ‘ध्येयवेडा आयएएस’ याची चर्चा होती. सरोजला आयएएस अधिकारी व्हायचे होते. म्हणूनच त्याने मोटारसायकलीवर ध्येयवेडा, असे लिहिले होते. त्या खालीच तिरंगात आय. ए. एस. लिहिले होते. याच ध्येवेड्याचे ध्येय आज अपुरेच राहिले. त्याचा अपघात झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना मित्रांकडून समजली. मात्र केवळ अपघात झाला आहे. तो जखमी आहे. एवढीच माहिती वडील तानाजी यांना दिली होती. ते तातडीने पुण्याहून कोल्हापूरला यायला निघाले. सायंकाळी साडेपाचपर्यंत ते सातारा-कऱ्हाड रस्त्यावरच होते.

पोलिस ठाण्यातही चर्चा

दरम्यानच्या काळात पोलिसांनी अपघातस्थळी असलेल्या दोन्ही स्पोर्टस्‌ बाईक (मोटारसायकली) पंचनामा करून करवीर पोलिस ठाण्याच्या दारात आणल्या. चक्काचूर झालेल्या मोटारसायकली पाहण्यासाठी पोलिस आणि बघ्याची गर्दी झाली होती. तेथेही ‘ध्येयवेडा आयएएस’ याची चर्चा सुरू होती. शवविच्छेदनाच्या ठिकाणी त्याचे मित्र जमले होते. त्यांच्यात ही सरोजचे ध्येय अपुरे राहिल्याची चर्चा होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saroj powar killed in panhala accident kolhapur marathi news