Savitribai phule Anniversary special story by nandini narewadi
Savitribai phule Anniversary special story by nandini narewadi

आत्मसन्मानाच्या लढाईतील आधुनिक सावित्री

कोल्हापूर: स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, रूढी परंपराच्या माध्यमातून स्त्रियांवर होत असलेले अत्याचार कमी व्हावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या काळात काही महिला ‘मी सावित्री’ च्या रूपात समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर अशाच काही आधुनिक सावित्रींशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

कचरावेचक महिला, मुलांना दिला आधार
रस्त्यावर पडलेला कचरा, प्लास्टिक गोळा करून चरितार्थ चालवणारी कुटुंबे शहरात आहेत. या कुटुंबातील मुले अर्ध्यावरच शाळा सोडतात. हे ओळखून ‘अवनि’ संस्थेने कचरावेचक महिला व त्यांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबविले. हे उपक्रम राबविण्यात वनिता कांबळे यांचा मोलाचा वाटा आहे. राजेंद्रनगर, कळंबा, फुलेवाडी, वडणगे, यादवनगर, मुडशिंगी, रेंदाळ, निगवे, शिरोली येथील अशा महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे, बचत गट काढणे, महापालिकेकडून फिरता निधी देणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आदी उपक्रम त्या राबवतात. कचरावेचकांच्या मुलांसाठी अभ्यासिका, बाल अधिकार मंच, शालेय प्रगती आदी गोष्टींवरही भर दिला जातो. त्यांनी चारशेहून अधिक कचरावेचक कुटुंबातील मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे.

कौशल्यविकासातून महिलांना केले आत्मनिर्भर
 जिल्ह्यात विविध पिकांच्या उत्पादनांसोबत दुग्धउत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या पिकांच्यावर प्रक्रिया करून स्वतःला आत्मनिर्भर करण्याचा धडा स्वयंसिद्धाच्या सूर्यप्रभा भोसले देत आहेत. जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी व पन्हाळा या तालुक्‍यातील महिलांना नाचणीपासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण त्या देत आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्या या महिला शिक्षित आहेत, त्यांच्याकडे कौशल्यही आहे, मात्र त्याच्या वापरातून छोटासा व्यवसाय सुरू करू शकतो, याची जाणीव त्यांना नाही. हीच जाणीव त्यांना करून देण्यासोबत नाचणी, दूध यापासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण त्या देत आहेत. त्यासोबतच रांगोळी प्रशिक्षण, कुकिंगचे मोफत क्‍लासेस यामाध्यमातूनही त्या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

विशेष मुलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास
अवतीभोवती काय चाललंय, याची जाणीव नसते. शारीरिक क्रियाही झालेल्या माहीत नसतात, अशा मतिमंद मुलांना ३२ वर्षे शिक्षण देण्याचे काम जिज्ञासा व राही पुनर्वसन केंद्राच्या स्मिता दीक्षित करत आहेत. मतिमंद मुलांच्या शाळा असतात, हे समाजात माहीत नसण्याच्या काळात त्यांनी विशेष मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. १९९२ साली त्यांनी जिज्ञासा ही विशेष मुलांची शाळा सुरू केली. अशा मुलांना शोधून त्यांच्या पालकांना समजवण्याचे आव्हान पेलले. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना स्वयंनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले.  समाजात वावरताना पैशांचे मोजमाप, भाषा, अंकज्ञान, सामान्यज्ञान अशा व्यावहारिक गोष्टींची त्यांना माहिती दिली.

संपादन-अर्चना बनगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com