''महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहा''

युवराज पाटील   | Saturday, 24 October 2020

अन्यथा आपल्याला एकला चलो रे'ची भूमिका घ्यावी लागेल.  शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज रहा. असे आव्हान शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज केले. शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, आमदार प्रकाश आबिटकर, शिवाजी जाधव हे यावेळी उपस्थित होते.

दुधवडकर म्हणाले, 'कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढायचे की, महाविकास आघाडी एकत्र लढायचे याचा निर्णय राज्यस्तरावर होईल. अन्यथा आपल्याला एकला चलो रे'ची भूमिका घ्यावी लागेल. महापालिके बरोबर जिल्हा परिषद निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे. ज्याच्या हाती जिल्हा परिषद त्याच्या हाती जिल्हा असे म्हटले जाते. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. मुंबईनंतर शिवसेना कुठे अस्तित्वात असेल, तर ती कोल्हापुरात आहे. असे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने म्हणतात.

कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेला मानणारा आहे. हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर संकटावर संकट येत आहेत. मात्र त्यांची छाती मर्दाची आहे. राष्ट्रवादीची साथ आहे. हे सर्वात महत्वाचे आहे. सीमाप्रश्नाबाबत मराठ्यांवर होणारा अत्याचार असुदे, किंवा अन्य कोणताही प्रश्न असू दे,  प्रत्येक भूमिकेत शिवसेना आक्रमक राहिलेली आहे. तो चेहरा आपल्याला पुढे चालवायचा आहे. महापालिका निवडणुकीसंबंधी जिल्हाप्रमुख माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सोबत बैठक घेऊन आपण पुढील नियोजन ठरवू. पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केलेली खंत योग्य आहे.

पदाधिकाऱ्यांनी कामाला लागायला हवे. गेल्या निवडणुकीत पाच आमदार कसे पडले याचे आत्मपरीक्षण करू. महामंडळावर यापुढे प्रामाणिक शिवसैनिकालच न्याय दिला जाईल. पदाधिकाऱ्यांनी अशा शिवसैनिकांची नावे माझ्याकडे द्यावी. त्यांची पडताळणी करून या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आमदार पदाधिकारी यांच्यापेक्षा शिवसेना महत्त्वाची असून त्यादृष्टीनेच पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी बाबत अधिक आक्रमक भूमिका  घ्यावी. असे आवाहन केले. पदेही मिरवण्यासाठी नसतात तर ती कामासाठी असतात. असेही ते म्हणाले. विजय देवणे यांनी जिल्ह्यातील सदस्य नोंदणी बाबत आपली भूमिका व्यक्त करताना पक्षासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केली जाईल असे आश्वासन दिले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी भुदरगड तालुक्यातून मोठ्या संख्येने पक्ष होण्यासाठी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

संपादन - अर्चना बनगे