दुर्गराज रायगडावर 'असा' साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा...

संदीप खांडेकर
Saturday, 6 June 2020

निसर्ग वादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला असून मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

रायगड - दाट धुके, मोजक्‍या शिवभक्‍तांचा उत्साह व भारावलेल्या वातावरणात दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक साधेपणाने आज साजरा झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सुवर्णनाण्यांचा अभिषेक झाला. आणि जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवाजी या जयघोषात हा परिसर दणाणून गेला.

दरम्यान, निसर्ग वादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला असून मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. दुर्गराज रायगड परिसरातील 21 गावांसाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल, अशी ग्वाही दिली.
संभाजीराजे यांनी कोरोनामुळे सोहळा साधेपणाने साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. हा सोहळा शिवभक्तांनी घरोघरी साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत घरोघरी शिवराज्याभिषेक साजरा केला. तर रायगडावर मोजक्‍या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या विचारांचा जागर केला.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

काल गडावर पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी दाट धुक्‍याने गडाला वेढले होते. नगारखान्यासमोर यौवराज शहाजीराजे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर युवराज संभाजीराजे व शहाजीराजे शिवरायांची उत्सवमुर्ती घेऊन राजसदरेकडे रवाना झाले. त्यानंतर मोजके कार्यकर्ते शिवरायांचा अखंड जयघोष करत संभाजीराजेसोबत होळीच्या माळाच्या दिशेने रवाना झाले. जगदीश्‍वरांचे दर्शन घेतल्यानंतर शिवसमाधीला अभिवादन करण्यात आले. दरम्यान शिवभक्‍तांना मार्गदर्शन करताना संभाजीराजे म्हणाले, "रायगड जिल्ह्याला कोरोनासह निसर्ग चक्रीवादळासह जोरदार फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यानी या जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करायला हवे. 21 गावातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल. कोरोनाच्या पादुर्भावाने देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. बेरोजगारीचे संकट तरूणांवर ओढावले आहे मात्र त्यांनी छ. शिवाजी महाराजांचे विचार लक्षात घेऊन वाटचाल करावी.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivrajyabhishek ceremony was celebrated at Durgaraj Raigad