आम्ही आता जायचे कुठे ? शिवसैनिकांची खंत...

Shivsena Uncomfortable Feel In Shirol Taluka Kolhapur Marathi News
Shivsena Uncomfortable Feel In Shirol Taluka Kolhapur Marathi News

जयसिंगपूर (कोल्हापूर) : शिरोळ तालुक्‍यातील शिवसेनेत सध्या नाराजीनाट्याने अस्वस्थता पसरली आहे. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी आमदार उल्हास पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपला सवतासुभा मांडला आहे. त्यामुळे आपण जायचे कुठे असा प्रश्‍न कट्टर शिवसैनिकांना पडला आहे. दुफळी सेनेला परवडणारी नसल्याने वरीष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून सेना एकसंघ ठेवण्याची गरज आहे. 

शिवसेनेचे तालुक्‍यातील पहिले आमदार म्हणून निवडून आलेले उल्हास पाटील यांनी तालुक्‍यात सेनेची मजबूत बांधणी करत सुमारे चारशे कोटींची विकासकामे मार्गी लावली. मात्र, विधानसभा निवडणूकीतील बदलत्या राजकारणामुळे त्यांना एकाकी झुंज द्यावी लागली. साठ हजार मते घेऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी सेनेशी एकनिष्ठ राहून कामाला सुरुवात केली. याकाळात आमदार यड्रावकर यांनी थेट "मातोश्री' गाठून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठींबा देत शिवसेनेत चंचुप्रवेश केला. 

गट सध्या अस्वस्थ

यानंतर सेनेच्या कोट्यातून यड्रावकर यांना मंत्रीपद दिल्याने शिवसेनेतील उल्हास पाटील यांना मानणारा गट सध्या अस्वस्थ आहे. यातून सेनेतील दुफळी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मंत्री यड्रावकर यांचा ठिकठिकाणी सत्कार समारंभ होत असताना उल्हास पाटील यांनी याकडे पाठ फिरविल्याने हि चर्चा अधिकच ठळक बनली आहे. यड्रावकर यांनी सहकार, शैक्षणिक, कृषी व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

हेही वाचा- अबब ! या मावळ्याने कापले दांडपट्ट्याने 4000 लिंबू...
 महालक्ष्मी मंदिरात शिवबंधन 

स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्यापासून चार वेळा पराभव पत्करल्यानंतरही जिद्दीमुळे आमदार आणि मंत्री झालेल्या यड्रावकर यांनी सेनेचे मंत्रीपद स्विकारल्यानंतर डिजीटल फलकांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे झळकले. महालक्ष्मी मंदिरात शिवबंधनही बांधले. सेनेशी कट्टर असणाऱ्या शिवसैनिकांना यामुळे शिवसेनेला बळकटी मिळेल असे वाटत असताना उल्हास पाटील यांना मानणारा गट मात्र निराश बनला आहे. सेनेच्या नेत्यांनी आमची बाजू विचारात घेतली नसल्याची सल त्यांना बोचत आहे. 

बाळासाहेबांची जयंती समोरासमोर 
जयसिंगपूरमधील क्रांती चौकात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती समोरासमोर साजरी करुन सेनेतील दुफळी उघड झाली आहे. यानंतर तालुका प्रमुख सतीश मलमे यांनी हि बाब थेट वरीष्ठ नेत्यांपर्यंत नेली. तात्पुरते पॅचवर्क झाले असले तरी मनोमिलन अद्याप झाले नसल्याने मतभेद कायम आहेत. 
 

दोन नेते एकत्र आल्यासच गड अभेद्य 
माजी आमदार उल्हास पाटील यांनी तालुक्‍यातील सेनेत जान आणली आहे. तर सहकारातून मंत्री यड्रावकर यांनीही रचनात्मक कामाचा डोंगर उभारला आहे. हे नेते एकत्र आल्यास तालुक्‍याचा गड अभेद्य राहणार आहे. अन्यथा, भविष्यात सेनेला याचा मोठा फटका शक्‍य आहे. 

पक्ष देईल तो आदेशाचे पालन
शिरोळ तालुक्‍यातील अंतर्गत गटबाजीची माहिती "मातोश्री'वर पोहोचली आहे. पक्ष देईल तो आदेश मानून काम करणार आहे. सेनेचे नुकसान टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पुढील निर्णय वरीष्ठ नेतेच घेतील. 

- सतीश मलमे ( शिरोळ तालुका प्रमुख, शिवसेना)  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com